मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाच्या महापुरुषांच्या यादीमध्ये बाळासाहेबांचे नाव समाविष्ट करण्याकरिता शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते आणि त्याबाबत योग्य निर्णय झाला आहे. विधिमंडळातही याबाबत काम झाले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि विचार देशाला कायमच मार्गदर्शक राहतील. तसेच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदारपणे केली आहे. स्वातंत्र्यवीराच्या कार्यावर आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या अनमोल त्यागासाठी त्यांना भारतरत्न किताबाने यापूर्वीच सन्मानित करणे अपेक्षित होते. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान होण्यासाठी त्यांना केंद्र सरकारने हा किताब देण्यासाठी पावले उचलणे अत्यावश्यक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी मी विधान परिषद उपसभापती या नात्याने करीत आहे, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
विधान भवनातही केले अभिवादन आज विधान भवन, मुंबई येथे आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विधी मंडळ सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते.