मुंबई : काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी हॉटेल जे. डब्ल्यू मॅरिएट येथील काँग्रेस आमदारांच्या बैठकीत याबाबतची घोषणा केली.राज्यात निर्माण झालेला सत्तापेच आणि राजकीय नाट्यात काँग्रेसने सर्वात उशीरा आपल्या गटनेत्याची निवड केली. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असण्याच्या काळातही काँग्रेसने गटनेता निवडला नसल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत होते. मात्र, अजित पवार प्रकरणामुळे गटनेता निवड टाळण्याची काँग्रेसची भूमिकाच शहाणपणाची ठरली. अखेर, आज राजकीय समीकरणे स्पष्ट होताच काँग्रेसने तातडीने आपल्या गटनेत्याच्या नावाची घोषणा केली.या आधी २३ नोव्हेंबर रोजी माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. प्रदेश प्रभारी, केंद्रातून आलेले निरीक्षक, राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांच्या या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता व अन्य पदाधिकारी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज जे. डब्लू मॅरिएट येथील काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थित नेते आणि आमदारांनी बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.तर, विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करून पुन्हा एक मोठी जबाबदारी दिल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांचे आभार मानले. आपण सर्वा$ंना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, के. सी. पडवी, विजय वडेट्टीवार, नसीम खान, सतेज पाटील, बाळू धानोरकर, शरद रणपिसे, बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नवविर्वाचित आमदार उपस्थित होते.एक मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहू.
काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 6:21 AM