मुंबई - काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्याचं पत्र दिलं आहे.
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नसीम खान यांची विधानसभेचे उपनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी बसवराज पाटील तर प्रतोदपदासाठी के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे, उपनेतेपदी रामहरी रुपनवार आणि प्रतोदपदी भाई जगताप यांच्या निवडीला मान्यता दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादर येथील टिळक भवनात काँग्रेसच्या विभागनिहाय बैठकांना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. शुक्रवारी मुंबई, ठाणे या जिल्ह्यांची चर्चा होणार आहे. बहुजन वंचित आघाडी सोबत येणार नसेल, तर पक्षातील सुशीलकुमार शिंदे, शरद रणपीसे, एकनाथ गायकवाड, जयवंत आवळे या ज्येष्ठ दलित नेत्यांनी विधानसभेला सामोरे गेले पाहिजे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवून काँग्रेसने निवडणूक मैदानात उतरले पाहिजे, अशी आग्रही मागणी आ. अमित देशमुख यांनी केली. ते म्हणाले, भाजपकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. त्यामुळे काँग्रेसनेही स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याने नाव मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. त्याला लातूर, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही जोरदार समर्थन दिले.