Join us

“वैयक्तिक सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही”: बाळासाहेब थोरातांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 11:54 AM

काँग्रेस हाच भाजपला देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. याला काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पलटवार करत, वैयक्तिक सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही, असे म्हटले आहे. 

परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात, अशी विचारणा बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय

भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पाहात आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी हेच केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.  

टॅग्स :बाळासाहेब थोरातममता बॅनर्जीभाजपामुंबई