लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी महिला सक्षमीकरणासाठी उत्तर प्रदेशमध्ये ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ हे अभियान सुरू केले. या अभियानामुळे उत्तर प्रदेशसह देशभरातील मुलींमध्ये व महिलांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. हे अभियान केवळ निवडणुकीचे अभियान नसून देशभरातील महिलांना ताकद देणारे अभियान आहे. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियान देशातील राजकारणाची दिशा बदलणारे असल्याचे मत महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या अभियानांतर्गत मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या पिंक रन मॅरेथाॅनला महसूलमंत्री थोरात यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस महासचिव बी. एम. संदीप यांच्यासह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले की, ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ हे अभियान आणि घोषवाक्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही तर, जगामध्ये जिथे-जिथे महिलांवर अत्याचार होत आहे, तेथील महिलांना ताकद देणारे घोषवाक्य बनले आहे, असे थोरात म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या पिंक रन मॅरेथाॅनमध्ये तब्बल सहा हजार महिलांनी सहभाग घेतला होता. १८ ते ३५, ३५ ते ५५ आणि ५५ ते पुढे अशा तीन वयोगटांमध्ये मॅरेथाॅन दौड पार पडली. यातील १८ ते ३५ या वयोगटाचे विजेतेपद अलिबागच्या ऋतुजा सकपाळ यांनी पटकावले. तर दुसरे स्थान चिपळूण, रत्नागिरीच्या साक्षी पड्याळ व तिसरे स्थान डोंबिवलीच्या प्रियांका पाईकराव यांनी पटकावले. ३५ ते ५५ वयोगटात विजेतेपद अरुणा मिश्रा यांनी पटकावले. तर दुसरे स्थान आंचल मारवा आणि तिसरे स्थान क्रांती साळवी यांना मिळाले.