मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट झाली होती, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असून भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते. त्यावर आमची नाराजी होती. आम्ही याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतले आहे. मात्र, भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही. या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
बुधवारी पुण्यात 'लोकमत'च्या वतीने आयोजित 'लोकमत पत्रकारिता पुरस्कार' सोहळ्यात संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठ-मोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत होत्या. तसेच, त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
राऊतांच्या वक्तव्यांनी आघाडीत बिघाडी; काँग्रेससह राष्ट्रवादीतही नाराजी
आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे; उद्धव ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया
इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन
इंदिरा गांधी आणि करीम लालाच्या भेटीबाबतचे विधान संजय राऊत यांच्याकडून मागे