मुंबई : मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट व महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य सरकार प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्व्हिशनिंग फिल्म, मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप सत्रात बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली.
आज मराठी चित्रपट गावागावात पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण ठरवत असताना सगळ्या बाबींचा विचार करून, एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ठोस सूचना मिळतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाक्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी सांस्कृतिक कार्य विभाग या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील. कलाक्षेत्रातील सर्वच दिग्गजांना सरकार जलद गतीने सर्वतोपरी मदत करेल. येत्या काळात सांस्कृतिक क्षेत्रांतील सर्व कलांना कसा वाव देता येईल आणि मराठी चित्रपट, नाट्य, मनोरंजन, लोककला आदींचे भवितव्य कसे उज्ज्वल करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहणार आहे.