'रोखठोक : सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 08:02 AM2021-01-24T08:02:39+5:302021-01-24T08:03:29+5:30
कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले.
मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे आपल्या देशाचे मोठे नेते व मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांच्या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे ऋणानुबंध होते. सर्वपक्षीय दिग्गज नेते पक्षीय उंबरठे ओलांडून एकत्र आले आहेत, हा माझ्या आयुष्यात अविस्मरणीय दिवस आहे. यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. आज बाळासाहेब असायला हवे होते, म्हणत त्यांनी रोखठोक आपलं मत मांडलंय.
कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे राजकारणातील दुर्मिळ चित्र यानिमित्ताने दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोनशिलेचे लोकार्पण केले. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्ष आणि संघटनांचे मान्यवर येथे हजर होते. त्यामुळे, बाळासाहेबांचा आदर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आजही तेवढाच असल्याचे सिद्ध झाले.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज बाळसाहेब असायला हवे होते म्हणत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. 'बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व, आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्य़ांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते. त्यांच्या आठवणीने आजही महाराष्ट्र आणि देश रोमांचित होऊन उठतो. कारण देश पेटविण्याची किमया त्यांनी वारंवार केली. आज असे नेतृत्व दिसत नाही.', असे म्हणत बाळासाहेबांची उणीव दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ते आज हवेत !
बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. 'हम करे सो कायदा' ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते. नोटाबंदी, लॉक डाऊनसारख्या संकटांनी हतबल झालेल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी बाळासाहेब हवे होते. कश्मीरातील अतिरेक संपलेला नाही, पण ''माझ्या शिवसैनिकांच्या हाती एके-47 द्या, कश्मीरातील दहशतवाद संपवून दाखवतो'' असे ठणकावणारे बाळासाहेब हवे होते. ''अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही'' अशी 'गिधड' धमकी देताच केंद्राचे सरकार गर्भगळित झाले, पण मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राटाने उलटखाती त्या धमकीच्या ठिकऱ्य़ा उडवत गर्जना केली, ''अमरनाथ यात्रा होणारच! एका जरी अमरनाथ यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर याद राखा. हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही.'' बस्स! अतिरेक्यांचा मामला थंड. आज ते बाळासाहेब हवे आहेत असे दिल्लीच्या सीमेवर 50 दिवसांपासून थंडीवाऱ्य़ात लढा देणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांनाही वाटत असेल. शेतकऱ्य़ांच्या बाजूने बाळासाहेबांनी एकच गर्जना करून अहंकारी सरकारला सळो की पळो करून सोडले असते, असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेबांचा शब्द म्हणजे न्याय
कुलाबा परिसरातील एका ट्रॅफिक आयलॅण्डवर बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते केले. मुख्यमंत्री कोण, तर उद्धव ठाकरे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे व तो 'ठाकरे' आहे. कुलाब्यातील काही नतद्रष्ट लोकांनी बाळासाहेबांच्या पुतळ्यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा त्यांनी आधार घेतला. केरळमधील एका ट्रॅफिक जंक्शनवर तेथील एका नेत्याचा पुतळा बसवायचा होता. कोर्टाने तो रोखला. ट्रॅफिक जंक्शनवर यापुढे पुतळे उभारता येणार नाहीत हा तो निर्णय. कारण काही असेल, पण बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण थाटात पार पडलेच आहे. जिवंतपणी कोणत्याही कोर्टाची पर्वा बाळासाहेबांनी केली नाही. बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले की, कोर्ट सुरू. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे न्याय हे कित्येक वर्षे महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांचे हिंदुत्व फक्त पोथीपुराण, शेंडी-जानव्याचे नव्हते
बाळासाहेबांनी मस्तवाल राजकारणी, भांडवलदार, मुंबईचे 'भाई' लोक यांना आपल्या चरणाशी आणले होते. आज मोदी-शहांची आरती गाणारे मुंबईतील गुजराती बांधव 1992 नंतर बाळासाहेबांचे भक्त झाले. ''बाळासाहेब होते म्हणून आमच्या लेकी-सुनांची इज्जत वाचली'' असा डंका हे व्यापारी लोक जगभर पिटत होते. कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व फक्त पोथीपुराण, शेंडी-जानव्याचे नव्हते. ते अंगावर येणाऱ्य़ाचा कोथळा काढणाऱ्य़ा तळपत्या तलवारीचे होते. बाळासाहेबांनी शूरवीर घडवले व शूरांचे नेतृत्व केले. त्यामुळे पाठीत वार करण्याची त्यांना कधी गरजच पडली नाही. इतका खुल्लमखुल्ला, दिलदार मनाचा नेता देशाच्या इतिहासात झाला नसेल, असेही राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलंयय.