मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेना नेते, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांना वंदन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शिवर्तीर्थावर जाऊन दर्शन घेतले. तसेच, शिवाजी पार्क येथून खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना भाजपावर टीका केली. तर, रिपाइंचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीने पुन्हा एकत्र येण्याचा विचार मांडला.
रामदास आठवले यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर, ट्विट करुन महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छाही व्यक्त केली. ''शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्तीभीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली पण नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते. भविष्यात पुन्हा ती एकजूट व्हावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!'', असे ट्विट रामदास आठवले यांनी केलंय.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त विरोधी पक्षातील नेत्यांपासून ते महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच नेतेमंडळींनी आदरांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियातूनही अनेकांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेब हे आमचे प्रेरणास्त्रोत असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, रामदास आठवलेंनी आज दुपारी 2 वाजता चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याच्या उशिरा घेतलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत, असेही ते म्हणाले.