पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि धनुष्यबाण आम्हीच जिंकू- किशोरी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:07 PM2022-09-07T17:07:10+5:302022-09-07T17:08:18+5:30
शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी आज कोर्टात करण्यात आली.
मुंबई-
शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी आज कोर्टात करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शिवसेनेकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली जात आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या भूमिकेचा समाचार घेत आज खऱ्या अर्थानं शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आला असल्याचं म्हटलं आहे. तसंच आता पितृपक्ष सुरू होतोय आणि पितृपक्षात पितर खाली येतात असं म्हणतात. त्यामुळे बाळासाहेब खाली येतील आणि आम्हीच जिंकू, असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. टीव्ही-९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
"नियतीवर, न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी धनुष्यबाण चिन्ह आमच्यासोबतच राहील. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करुन शिंदे गटाचा खरा चेहता आता समोर आला आहे. त्यांचे खरी नखं, दात सर्वांना दिसू लागले आहेत. एकतर चिन्ह स्वत:कडे घ्यायचं किंवा ते गोठवायचं असा यांचा प्लान आहे. चिन्ह महत्त्वाचंच आहे. पण एखाद्या दबावामुळे समजा ते आमच्याकडून गेलं तरी आमच्या मनामनात शिवसेना आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पितृपक्षात आमच्याच बाजूनं निकाल लागेल
निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी यावेळी पितृपक्षाचा दाखला दिला. "शिंदे गटाबाबतच्या बऱ्याच गोष्टी आता ओघानं बाहेर येत आहेत. आता पितृपक्ष येत आहे आणि शिवसेना हा पितृपक्षच आहे. बाळासाहेबांचा पितृपक्ष आहे. आमचा पितृपक्ष आहे. असं म्हणतात की पितृपक्षात पितर खाली येतात. त्यावेळी बाळासाहेब नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
शिंदे गटाचं खरं रुप बाहेर येतंय, आम्हीही दाखवून देऊ
"शिंदे गटाचे मनसुबे, रंग आणि चेहरा आता सर्वांना दिसू लागला आहे. आमच्याकडे चिन्हावर लढूनही अनेकजण हरलेली आहेत. चिन्ह महत्वाचंच आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. पण कोर्ट जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. घराघरात चिन्ह पोहोचवू आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहू. गेलेला गटा शिवसैनिक नाही किंवा ते शिवसेना देखील नाहीत. तो भाजपाचाच गट आहे. त्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.