Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. भाजप आणि शिंदे गटाने पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याची जय्यत तयारी केली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणारी कामे शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेची आहेत. शिंदे-फडणवीस सरकार केवळ श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. २५ वर्षे मुंबईला खड्ड्यात घालण्याचे काम कुणी केले? मुंबईकरांचा विश्वासघात कुणी केला? अशी विचारणा शिंदे गटातील नेत्याने केले आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवाजी पार्क या ठिकाणी जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मुंबईला खड्ड्यात घालण्याचे काम ज्यांनी मागची २५ वर्षे केलं आज तेच नाकं मुरडत आहेत. मुंबईकरांचा खड्ड्यात घालण्याचं काम कुणी केलं? मुंबईकरांचा विश्वासघात इतकी वर्षे कुणी केला? आज तेच लोक आमच्यावर आरोप करत आहेत. करोना काळातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे त्याची पोलखोल होण्यास सुरूवात झाली आहे. हा सगळा भ्रष्टाचार लवकरच माध्यमांसमोर येणार आहे, असे पावसकर यांनी स्पष्ट केले.
पुढची किमान २५ वर्षे खड्डे मुक्तीसाठी प्रयत्नशील
मुंबईकरांच्या विकासाठी त्यांना पुढची किमान २५ वर्षे खड्डे मुक्त रस्त्यांवरून जाता यावे यासाठी आम्ही काम करतो आहोत. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी यावर बोलू नये, असा खोचक टोला पावसकर यांनी लगावला. एक लक्षात घ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवला आहे. मुंबईतल्या कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणासाठी जर ते येत असतील तर श्रेयवादाची लढाई कशाला करता? अशी विचारणा करत, मुंबईकरांचे हे भाग्य आहे. ज्यांना टीका करायची आहे त्यांना कुठे टीका करायची तेही कळत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असे पावसकर म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधिमंडळात लागते आहे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या विचारांपासून तुम्ही दूर गेला आहात. आता जे तैलचित्र लावले जात आहे त्याचा अभिमान बाळगा त्यावरून राजकारण करू नका. बाळासाहेब ठाकरे यांची जी कर्तबगारी होती तशी तर त्यांच्या मुलाला दाखवता आलीच नाही. खरे तर ते मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय घ्यायला हवा होता, असे किरण पावसकर यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"