Maharashtra Politics: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिंदे गटानेही भाजपसोबत मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक एकत्रच होतील, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार, यावर शिंदे गटातील खासदाराने मोठे विधान केले आहे.
अलीकडेच शिंदे गटात सामील झालेले खासदार गजानन कीर्तिकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाकित वर्तवले आहे. गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच राज्यातील ४० पैकी २० महापालिका आपण जिंकणार आहोत, असा विश्वास गजानन कीर्तिकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा महापौर बसणार
मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा महापौर बसणार आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसतील ही आमची जिद्द आहे, असे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. तसेच मी ४५ वर्ष बाळासाहेबांसोबत काम केले. त्यांनी मला अनेक पदे दिली. उद्धव ठाकरे यांच्या काळात मला तीनदा उमेदवारी मिळाली. कारण माझी उमेदवारी कापण्याची त्यांची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची हिंमत नव्हती. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला सारले, अशी खंत कीर्तिकर यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिले. तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचे ठरवले अन् बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन आपली विचारधारा बदलली. खोक्यांसाठी ४० आमदारांनी बंड केलं नाही. माझ्या मनातही कुठे ना कुठे खदखद होती. त्यामुळे मीही बाहेर पडलो, असे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"