Join us

Maharashtra Politics: “राजीनामा देऊन पोलीस यंत्रणांवर दबाव टाकण्याचा जितेंद्र आव्हाडांचा प्रयत्न हास्यास्पद”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:08 PM

Maharashtra News: खोटा कांगावा करण्यापेक्षा कोर्टात जाऊन सिद्ध करावे, असे आव्हान शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिले आहे.

Maharashtra Politics: ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, राजीनामा देतो, हे सांगून जितेंद्र आव्हाड पोलीस यंत्रणांवर दबाव आणत असून, हे हास्यापद असल्याची बोचरी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. 

एखाद्या महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर विनयभंग झाला आहे, अशी तक्रार केल्यास त्यासंदर्भात केस दाखल करून घेणे पोलिसांचे काम आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. तुम्हाला ही केस खोटी वाटत असेल, तर कोर्टात जाऊन सिद्ध करावे, असे आव्हान देत, हे कायद्याचे राज्य असल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान सर्वांसाठी समान असून, तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला वेगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे, अशी अपेक्षा असेल, तर ते गरजेचे नाही, असे शीतल म्हात्रे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

राजीनामा देऊन पोलीस यंत्रणांवर दबाव टाकण्याचा जितेंद्र आव्हाडांचा प्रयत्न हास्यास्पद

राजीनामा देऊन पोलीस यंत्रणांवर दबाव टाकण्याचा तुम्ही जो काही प्रयत्न सुरू केला आहे, हा खूप हास्यास्पद आहे. प्रत्येक माय-भगिनीचे संरक्षण करणे सरकारचे काम आहे आणि सरकार ते चांगल्या पद्धतीने करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की न्याय मिळत नाही, तर कांगावा करण्यापेक्षा कोर्टात जाऊन सिद्ध करावे, असे थेट आव्हान शीतल म्हात्रे यांनी दिले. केतकी चितळे प्रकरण असो वा आनंद करमुसे प्रकरण असो यामध्ये तुम्ही काय केले, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. खोटा कांगावा करणे, आदळआपट करणे आपला स्वभाव आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे आपण जे काही करत आहात, ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, अशी घणाघाती टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यानंतर जयंत पाटील, अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. तसेच एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेस