Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस आणि सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा भाजप आणि शिंदे गटाकडून खरपूस समाचार घेतला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला यासाठी जबाबदार धरले. यानंतर आदित्य ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला, असा टोला लगावण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला. याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हटलं, हे अत्यंत चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच खरे तर उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणे अपेक्षित होते. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चालले असते. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोरासमोर डिबेटला यावे असे खुले आव्हान आदित्य ठाकरेंना दिले. यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला
आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिल्यावर बालिश बहु बडबडला, हेच वाक्य आठवते. आपले वय, आपला अनुभव आणि आपण काय बोलत आहोत, याबाबत आदित्य ठाकरे यांनी विचार करणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. तिथे लक्ष दिले तर अधिक बरे होईल. मात्र, तेथील मूळ आमदार असलेले सुनील शिंदे हेच चांगले होते, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. वरळीमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे, याचे उत्तर पुढील निवडणुकीत जनताच तुम्हाला देईल, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर केली. तसेच पत्रकार परिषदेत जी कागदपत्रे दाखवली, त्यावरून अतिशय कमी माहिती किंवा चुकीची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, लोकांमध्ये कसा संभ्रम निर्माण करायचा, हेच काम आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेने केल्याचा हल्लाबोलही शीतल म्हात्रे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणे हास्यापद असल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमचे नवे सरकार आले, त्याला तीनच महिने होत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यासाठी २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या योजनांना मंजुरी दिलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात कुणी यायला तयार नव्हते गुंतवणूक करायला तयार नव्हते. महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक तुमच्या कारभारामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेली. तुम्हाला महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय, अशी विचारणा करत, अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मविआ काळात अनेक प्रकल्प बाहेर जात होते. मात्र, ते रोखण्यासाठी विरोधी बाकांवर असतानाही आम्ही प्रयत्न केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"