"कर्तृत्ववान होते म्हणून बाळासाहेबांचे वर्चस्व," नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:21 AM2022-05-02T06:21:04+5:302022-05-02T06:22:44+5:30
जे साहेबांनी कमावले, ते काहींना टिकवता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलूच नका. तो नैतिक अधिकार तुम्हाला नाही, नारायण राणेंचा निशाणा.
"दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान होते. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले, राज्य आणले. त्यामुळे उगाच त्यांच्या गुणांचे मूल्यमापन करण्याच्या प्रयत्न करू नका," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी टीका केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे मंत्री राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. "उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेण्याचे काम केले आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर घसरला आहे. मंत्रालयात न येता सत्तेची पाच वर्षे कशी पूर्ण करणार, असा सवाल करताना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला यांचा काहीच फायदा नाही," असेही राणे म्हणाले.
बाळासाहेब भोळे होते म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला गेल्याचे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, "बाळासाहेबांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका. ते कर्तृत्ववान होते म्हणून त्यांनी वर्चस्व निर्माण केले. कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस या दोन शब्दांवर त्यांनी आपले राजकारण पुढे नेले." "त्यांच्यात माणुसकी होती. जे साहेबांनी कमावले, ते काहींना टिकवता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलूच नका. तो नैतिक अधिकार तुम्हाला नाही," अशी टीका राणे यांनी केली.
मशिदींवरील भोंग्यांबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवावे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली होती. यावर, राणे म्हणाले की, यांचे नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी सध्याचे नियम, धोरणानुसारच भोंगे उतरविल्याचे राणे म्हणाले.
३७ एमएसएमई क्लस्टर उभारणार
देशाच्या विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच येत्या दोन वर्षांत एमएसएमईअंतर्गत महाराष्ट्रात ३७ क्लस्टर उभे करणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.