Join us  

महापौर निवासस्थानी बाळासाहेबांचे स्मारक !

By admin | Published: September 26, 2015 3:14 AM

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बहुचर्चित स्मारक उभारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जागेचा शोध अखेर संपला आहे.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बहुचर्चित स्मारक उभारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जागेचा शोध अखेर संपला आहे. राजकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क परिसरातील महापौर निवासास्थानी स्मारक उभारण्याबाबतच्या हालचालींनी वेग घेतला आहे.बाळासाहेबांच्या स्मारकासाठीच्या जागेचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने महापौर निवास स्थानावर शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय माहिती आहे. शिवाय महापौर निवासस्थान अन्यत्र हलविण्याबाबतही हालचाली सुरु झाल्या आहेत. भायखळा येथील अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निवासस्थान अथवा पालिका आयुक्तांचे निवासस्थान या दोन जागांची महापौर निवासस्थानासाठी चाचपणी सुरु आहे. महापालिकेकडे आता याबाबतचा प्रस्ताव मांडण्याबाबतची तयारी सुरु झाल्याचे शिवसेनेतील सुत्रांकडून समजते. महापौर बंगल्यासह पार्क क्लबला भाडेतत्त्वावर देण्यात आलेली लगतची जागा स्मारकासाठी घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, अशी इच्छा तमाम शिवसैनिकांची होती. तत्कालीन सरकारने मात्र हे शक्य नसल्याचे म्हटले होते. परिणामी स्मारक समितीने यासाठी उर्वरित जागांचा शोध सुरु ठेवला होता.परळ येथील ‘हाफकीन’ संस्थेच्या जागेचा विचार सुरु होता. ‘हाफकीन’ने मात्र जागा देण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर अखेर महापौर बंगल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.महापौर बंगल्यासह वडाळ्यातील आयमॅक्स सिनेमागृहाशेजारील दोन भुखंड, परळ येथील दोन भुखंडाचा विचार झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र त्या जागा आवडल्या नव्हत्या. महापौर निवासस्थानी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले तर शिवाजी पार्क येथील महापौर निवास भायखळ्यातील प्राणीसंग्रहालयालगतच्या हेरिटेज बंगल्यात हलविण्यात येईल. शिवाय दुसरा पर्याय म्हणून महापालिका आयुक्तांसाठी असलेला बंगल्याकडे पाहिले जात आहे.