गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव : वनमंत्री संजय राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:06 AM2021-01-20T04:06:54+5:302021-01-20T04:06:54+5:30
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव वनमंत्री संजय राठोड : प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार सफारीचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव
वनमंत्री संजय राठोड : प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार सफारीचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. तसेच या उद्यानातील सफारीचे काम पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारीला सफारीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीतील या उद्यानात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यातील सफारीचे काम पूर्ण झाले असून, २६ जानेवारीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सफारी जनतेसाठी खुली हाेईल. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारीसाठी प्राण्यांचे स्थलांतरणही करण्यात आले आहे. सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर ४० आसनी क्षमतेची तीन विशेष वाहने तसेच ऑनलाइन तिकिट बुकिंग सुविधा सुरू होईल.
जवळपास दोन हजार हेक्टर वन क्षेत्रावरील हे प्राणिसंग्रहालय नागपूर शहरापासून केवळ सहा किलोमीटर आहे. एक महत्त्वाचे व मोठे पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही राठोड यांनी दिली.
.................................