Join us

विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 7:52 PM

राज्यात सत्तास्थापनेपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षामध्ये खडाजंगी सुरुच आहे. त्यातच, बाळासाहेबांच्या नावानेच दोन्ही पक्षाचं राजकारण होत असून आता आणखी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हे राजकारण होताना दिसत आहे

मुंबई - विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून २३ जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. तत्पूर्वीच या तैलचित्रावर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने नाराजी व्यक्त केली. तैलचित्र अपेक्षेनुसार नसल्याची भावना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर, आता या तैलचित्र अनावरण सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याचे नाव नाही किंवा स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचेही नाव नाही. त्यामुळे तैलचित्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तास्थापनेपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षामध्ये खडाजंगी सुरुच आहे. त्यातच, बाळासाहेबांच्या नावानेच दोन्ही पक्षाचं राजकारण होत असून आता आणखी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हे राजकारण होताना दिसत आहे. ते म्हणजे विधिमंडळात लावण्यात येणारं बाळासाहेबांचं तैलचित्र. बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रम पत्रिकेत ठाकरेंच्या कुटुंबातील कोणाचेही नाव नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या तैलचित्राचे अनावरण होत आहे. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. 

विधिमंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. या निमंत्रण पत्रिकेत स्नेहांकीत म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची नावे आहेत. तसेच, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांचेही नावं आहे. या पत्रिकेत उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणे टाळण्यात आला आहे. मात्र, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरे