Join us

‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 9:44 AM

‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले.

ठळक मुद्दे‘अनेकदा बाळसाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. बाळासाहेबांच्या काही आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले होते.

मुंबई- '1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे. ‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आजवर कुणालाही माहित नाही, असंही यावेळी अमिताभ बच्चन यांनी म्हंटलं.  

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेबांच्या काही आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले होते.

‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार यायचे. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असयाचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही व्हायचे त्यावेळी बाळासाहेब मला फोन करुन विचारायचे. हे चूक आहे की बरोबर?. एकदा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर असाच एक आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी मला फोन करुन मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि विचारलं की, हे आरोप खरे आहेत का? मी त्यांना सांगितलं की, हे आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर त्यांनी तडक मला सांगितलं. आता घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे.  एवढा धीर त्यावेळी दुसरा कोणत्याच व्यक्तीनं मला दिला नाही.’ अशा अनेक आठवणींना अमिताभ बच्चन यांनी उजाळा दिला. 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेअमिताभ बच्चनउद्धव ठाकरे