उद्धव ठाकरेंकडून सातत्याने रडीचा डाव; बाळासाहेबांच्या शिवसेनेने फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:03 PM2022-10-13T13:03:14+5:302022-10-13T13:04:06+5:30
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून केवळ रडीचा डाव खेळला जातोय. आमच्यावर अन्याय झाला असं सातत्याने रडायचं लोकांची सहानुभूती मिळवायची हा एकमेव उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे असं नरेश म्हस्के म्हणाले.
मुंबई - आरडाओरड करायची तर आम्ही करायला हवी. ८० टक्क्याहून अधिक बहुमत आमच्याकडे असताना शिवसेना-धनुष्यबाण आम्हालाच मिळायला हवं होतं. किती दिवस लोकांसमोर रडणार आहे. शिवसेना नाव लावताना सारखं सारखं रडून तुम्ही अपमान करताय. विजय झाला तर बाळासाहेबांचा आशीर्वाद म्हणायचा. पराभव झाला तर आम्हाला, केंद्रीय यंत्रणांना दोष द्यायचा ही कार्यपद्धती आहे असं सांगत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून केवळ रडीचा डाव खेळला जातोय. आमच्यावर अन्याय झाला असं सातत्याने रडायचं लोकांची सहानुभूती मिळवायची हा एकमेव उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे. गेली ३ महिने पदउतार होण्यापासून आतापर्यंत माझ्यावर अन्याय होतोय अशारितीने लोकांसमोर जायचं आणि सहानुभूती मिळवायची. आपलं कर्तृत्व काही नाही केवळ रडणे आणि रडणे आता लोक त्यावर विश्वास ठेवत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर चिन्ह, नाव लोकांसमोर स्वत: फेसबुक लाईव्हमधून जाहीर केले आणि निवडणूक आयोगावर आरोप करायचे. शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यापासून अन्याय होतोय असं रडगाणं सुरु होते. हायकोर्टानं शिवाजी पार्क वापरण्यास दिल्यावर फटाके वाजवले. दुटप्पी भूमिकेतून आपल्या बाजूने निर्णय झाल्यास विश्वास आहे बोलायचं आणि आपल्या बाजूने निर्णय न झाल्यास आरोप करायचे हे काम ठाकरे गटाकडून सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तुम्हीच मागितले होते. ते नाव दिल्यानंतर पुन्हा आरोप का करायचे? मशाल तुम्हीच मागितली होती असं नरेश म्हस्केंनी म्हटलं.
दरम्यान, तुम्ही मशाल चिन्हावरून छगन भुजबळांना बोलायला लावलं. २ दिवस मशाल चिन्हावरून रॅली काढली. मशाल हाती घेऊन मातोश्रीवर कार्यकर्ते आले. आता २ दिवसांनी तुम्हाला अन्याय झाल्याचं कळतंय. केवळ लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. परंतु तुमची कार्यपद्धती लोकांसमोर आली आहे. लोकांना फसवण्याचं काम तुम्ही करता. परंतु लोक आता फसणार नाहीत असंही नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना बजावलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"