मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीतील युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी युती करत या गटातही शिवशक्ती- भीमशक्ती युती असल्याचेही दाखवून दिले आहे. शिंदे आणि कवाडे यांनी या युतीची घोषणा केली आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची चर्चा जोरदार रंगली. महाविकास आघाडीत सामील होणार की नाही, का शिवसेनेसोबतच युती होणार? याचे अंदाज बांधले जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना जेवढ्या जागा देईल तेवढ्या लढणार, अशी घोषणा केली. ठाकरे गटातील युती चर्चेच्या टप्प्यात असतानाच एकनाथ शिंदे यांनी आज कवाडे यांच्यासोबत युती झाल्याचे जाहीर करत आपण एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्थानिक आमदार आणि खासदारांची विशेष टीम नेमली आहे. यामध्ये शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा समावेश आहे.
कवाडे यांचा लाँगमार्च योग्य ठिकाणी - शिंदेप्रा. कवाडे हे संघर्षातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांनी कारावास, लाठ्या- काठ्या खाल्या आहेत. आम्हीपण संघर्षातूनच इथपर्यंत आलो आहोत. दीन- दलित, पीडित यांना न्याय देण्यासाठी ते कार्यरत राहिले आहेत. आम्हालाही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची तीच शिकवण आहे. प्रा. कवाडे हे त्यांच्या लाँगमार्चसाठी ओळखले जातात. त्यांचा लाँगमार्च आता योग्य ठिकाणी आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय - कवाडेप्रा. कवाडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाडसी निर्णय घेतला. मी शाहू, फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा विचार असेल. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणे. भेदभाव न करता गोरगरिबांच्या हितासाठी काम करणे हे सरकारच्या माध्यमातून करणार आहे, असेही ते म्हणाले.