Join us

छठ पूजेसाठी कृत्रिम तलावाची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी, तलाव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 8:46 AM

गेल्या वर्षीही मुंबई महापालिकेतर्फे छठ पूजेसाठी काही ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती.

मुंबई : छठ पूजेसाठी मुंबईत जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला छठ पूजेसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश दिले.

शहरातील सर्व किनारे, तलाव, जलाशय याठिकाणी उत्तर भारतीय छठ पूजा साजरी करण्यासाठी येतात. नैसर्गिक जलाशय, तलाव यांना बाधा पोहोचू नये यासाठी उत्तर भारतीयांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छठ पूजेसाठी पालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली होती.

या मागणीला अनुसरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी एक निवेदन देऊन छठ पूजेसाठी कृत्रिम तलावांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत निर्देश दिले.

गेल्या वर्षीही... - गेल्या वर्षीही मुंबई महापालिकेतर्फे छठ पूजेसाठी काही ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. - छठ पूजेसाठी शहरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी या कृत्रिम तलावांचा लाभ घेतला होता. - यंदाही महापालिकेकडून तशीच सुविधा उपलब्ध करून दिली जावी, असा आग्रह उत्तर भारतीयांकडून केला जात होता.

टॅग्स :एकनाथ शिंदे