Join us

बालभारती विकणे आहे... गुगलवर जाहिरात झळकताच यंत्रणा खडबडून जागी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 8:22 AM

याबाबत तपासणी अहवाल आल्यावर नेमके काय झाले आहे हे उघड होईल, असेही बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशा स्वरूपाची जाहिरात गुगलवर झळकली आणि शिक्षण विभाग अक्षरश: हादरला. बालभारतीने तातडीने ‘हे नेमके  झाले कसे’ हे शोधण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज कामाला लावली. बालभारतीने यासंदर्भात तक्रार नोंदवल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. याबाबत तपासणी अहवाल आल्यावर नेमके काय झाले आहे हे उघड होईल, असेही बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, अभ्यासक्रम संशोधन करणाऱ्या ‘बालभारती’ या राज्य सरकारच्या संस्थेच्या ‘balbharati.in’ या संकेतस्थळाचे डोमेन दोन हजार युएस डॉलर किमतीला विकणे आहे, अशी जाहिरात गुगलवर प्रसिद्ध झाली होती. ‘ebalbharti.in’ या संकेतस्थळावर बालभारतीची पाठ्यपुस्तके ‘ई साहित्य’ स्वरूपात उपलब्ध आहेत. राज्यातील कोट्यवधी विद्यार्थी, लाखो पालक, शिक्षक या संकेतस्थळाला भेट देतात, तसेच या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात विनामूल्य डाऊनलोड करता येतात.

बालभारतीचे ‘balbharati.in’ हे अधिकृत डोमेन असून ते २००५-०६ या वर्षात घेण्यात आले आहे. तर या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया २०२३ मध्ये केली आहे. असे असतानाही कोणीतरी डोमेनबाबत खोडसाळपणा केल्याचे दिसून येत आहे.- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

डोमेनची मुदत संपली का ?balbharati.in हे डोमेनचे नाव आहे. हे नाव ऑनलाइन विकत घेऊन त्याचे शुल्क दरवर्षी किंवा एकदाच काही वर्षांसाठी भरावे लागते. एकदा विकत घेतलेले डोमेन दुसऱ्याला घेता येत नाही. डोमेनची मुदत संपण्यापूर्वी पुन्हा त्याचे नूतनीकरण करावे लागते. परंतु, मुदत संपल्याने बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली का, हेही तपासले जात आहे.

टॅग्स :मराठीमहाराष्ट्रशिक्षण