त्रिकुटाला अटक; आरे पाेलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चोरीनंतर ओळख लपविण्यासाठी टक्कल करणाऱ्या त्रिकुटाला आरे पोलिसांनी अटक केली. अब्दुल अली शेख (वय २१), आरिफ खाटीक (२०) आणि रागावत चव्हाण (१९) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी आणि १४ मोबाईल असा एकूण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरे परिसरातील विर्वानी इंडस्ट्री येथे २४ मार्च रोजी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होते. त्याचवेळी दुचाकीवरून जाणाऱ्याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चाैकशीत आरिफ आणि रागावत अशी त्यांची नावे असून, या गुन्ह्यातील मास्टर माईंड अब्दुल असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पाेलिसांनी तपासाअंती अब्दुल यालाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळख पटू नये, तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी ते चोरी केल्यानंतर टक्कल करून घ्यायचे. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
........................................