बळीराजा सुखावला : मान्सून समाधानकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:23 PM2020-08-30T13:23:29+5:302020-08-30T13:25:31+5:30
महाराष्ट्रात १७ टक्के अधिकचा पाऊस
मुंबई : जुन, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन विशेषत: ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार खेळी केली आहे. राज्यातील सर्व जिल्हयांत पावसाची ब-यापैकी नोंद झाली असून, सर्व जिल्हयांत सर्व साधारण पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातदेखील पावसाने पुरे पुर हजेरी लावली असून, बळीराजासाठी यंदाचा पाऊस समाधानकारक असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.
रविवारी सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने मुंबईत तुरळक ठिकाणी हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात जलधारा कोसळत असतानाच कुलाबा येथे ३७.२ आणि सांताक्रूझ येथे ५२.९ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. सकाळी ठिकठिकाणी कोसळत असलेला पाऊस दिवसभर अधून मधून का होईना मोठया मोठयाने बरसत असल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस ब-यापैकी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी पाऊस ब-यापैकी विश्रांती घेत कोसळत होता. सकाळी कोसळलेल्या पावसानंतर दुपारी काही ठिकाणी ऊनं पडले होते. मुंबईत पाऊस कोसळत असतानाच ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. ११ ठिकाणी झाडे कोसळली. २ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. १ ठिकाणी शॉर्टसर्किटची घटना घडली.
----------------
- १ जून ते २९ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १७ टक्के अधिकचा पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात या काळात ८०८.२ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी ही नोंद ९४४.२ मिमी एवढी झाली आहे.
- मुंबई शहरात ६७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारण १ हजार ६८९.९ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी २ हजार २ हजार ८१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- मुंबईच्या उपनगरात ६५ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. या काळात १ हजार ८४७ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी ३ हजार ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.