बळीराजा सुखावला; पाऊस पाणी समाधानकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:53 PM2020-09-30T14:53:46+5:302020-09-30T14:54:24+5:30
मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस
मुंबई : बघता बघता पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. या काळात पावसाने आपली कसर पुरेपुर भरून काढली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यांत अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर तिस-या स्थानी औरंगाबाद आहे. गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. चार महिन्यात येथे ९९९.८ मिमी पावसाची नोंद होते. यावर्षी हा पाऊस १ हजार १६३ मिमी एवढा नोंदविण्यात आला आहे. मुंबई, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्हयात पावसाची तुट आहे.
तब्बल चार महिने झोडपून काढलेल्या पावसाने ऋतू महिन्यानुसार ३० सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. असे असले तरी राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून अद्याप तरी महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ८ ऑक्टोबरच्या आसपास परतीचा मान्सूनचा प्रवास मुंबईतून देखील सुरु होईल. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सूनची समाधानकारक नोंद झाली आहे. विभागावार पावसाचा विचार करता मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. एकंदर सर्वदूर चांगला पाऊस झाला असून, राज्यातल्या बळीराजासाठी यंदाच्या मान्सूनने पुरेपुर पाऊस पाणी दिले आहे. मुंबईचा विचार करता येथेही पावसाने शंभरी पार केली असून, पावसाळयातल्या शेवटच्या दिवसापर्यंत ११७.२० टक्के एवढया पावसाची नोंद झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस टक्क्यांत
अहमदनगर ८९
मुंबई उपनगर ६७
औरंगाबाद ६४
मुंबई शहर ५८
आतापर्यंतचा एकूण पाऊस टक्क्यांत (मनपा स्वयंचलित केंद्र)
मुंबई शहर १२७.९९
मुंबई उपनगर १०८.५९
एकूण ११७.२०
हवामान केंद्र (आतापर्यंतचा पाऊस मिमी)
कुलाबा ३ हजार २०२.५
सांताक्रूझ ३ हजार ६८६.८
विभागवार पाऊस टक्क्यांत
कोकण, गोवा २८
मध्य महाराष्ट्र २९
मराठवाडा ३०
विदर्भ १० टक्के तूट