लवकरच बालकोविड विभाग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:50 AM2020-09-21T00:50:46+5:302020-09-21T00:50:55+5:30

वरळीचे कोविड केंद्र झाले अद्ययावत

The Balkovid section will begin soon | लवकरच बालकोविड विभाग सुरू होणार

लवकरच बालकोविड विभाग सुरू होणार

Next


- स्नेहा मोरे
मुंबई : वरळीचे एनएससीआय कोविड केंद्र आता अद्ययावत झाले असून धारावी आणि वरळी येथील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यात या केंद्राचा मोठा वाटा आहे. येत्या काही दिवसांत या केंद्रात खाटांच्या क्षमतेत वाढ होणार असून, लवकरच केंद्रात बालकोविड विभागही सुरू होणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. या केंद्रात पोलीस दल आणि न्यायाधीशांसाठी प्रत्येकी २० राखीव खाटा ठेवण्यात येणार आहेत.
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आॅफ इंडिया (एनएससीआय) केंद्र्र येथे कोरोना काळजी केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीला या केंद्र्राची क्षमता ५०० खाटांची होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आली आहे. सध्या या केंद्र्रात ५१८ खाटा आणि २८ अतिदक्षता विभागातील खाटा असून लवकरच ५० खाटा वाढविण्यात येणार आहेत.


आॅगस्ट महिन्यांपर्यंत मुंबईत कोरोना नियंत्रणात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे या केंद्र्रातही रुग्ण येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्र्राच्या डॉ. नीता वर्टी यांनी सांगितले. या केंद्र्रातील अत्याधुनिकीकरणाविषयी सांगताना डॉ. वर्टी म्हणाल्या, सुरुवातीला या केंद्र्रात एकच विभाग होता. आता निरनिराळे विभाग करण्यात आले आहेत. त्यात पोस्ट कोविड ओपीडी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, प्लाझ्मा दानासाठी समुपदेशन कक्ष, कर्करोग रुग्णांसाठी ५० राखीव खाटांचा विभाग, असे विभाग आहेत. शिवाय, मागील काही दिवसांत लहान मुलांना कोविड होण्याचे प्रमाण वाढत असल्याने लवकरच बालकोविड विभागही सुरू करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.


हायरिस्क असणाऱ्या रुग्णांना दहा जणांचा समूह करून डॉक्टर नेमण्यात आले आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी दररोज व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात येते. यात त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्याविषयी संपूर्णत: तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे, पोस्ट कोविड ओपीडीमध्येही फुप्फुसांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून उपचार देण्यात येतात.


रुग्णांना लवकरच दंतोपचारही मिळणार
कोविडमुळे अनेक महिन्यांपासून दंतचिकित्सकांचे दवाखाने बंद आहेत. शिवाय, रुग्णालयांमध्येही बाह्यरुग्ण विभाग बंद आहेत. परिणामी, दंतोपचारांविना अनेक रुग्ण वंचित आहेत. त्यामुळे दातांच्या आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाली आहे. याचा विचार करून केंद्रात लवकरच डेन्टल चेअर कक्षही सुरू करण्यात येईल. सध्या रुग्णांना प्रायोगिक तत्त्वावर दंतआरोग्याशी निगडित समस्यांवर उपचार देण्यात येत आहेत, त्याला उत्तम प्रतिसाद आहे.

Web Title: The Balkovid section will begin soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.