बालरंगभूमी परिषद बालकांना देणार लोककलेचे धडे; २५ हजार बालके सहभागी होणार

By संजय घावरे | Published: August 12, 2024 07:18 PM2024-08-12T19:18:11+5:302024-08-12T19:18:25+5:30

बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे.

Balrangabhoomi Parishad to give folk art lessons to children; 25 thousand children will participate | बालरंगभूमी परिषद बालकांना देणार लोककलेचे धडे; २५ हजार बालके सहभागी होणार

बालरंगभूमी परिषद बालकांना देणार लोककलेचे धडे; २५ हजार बालके सहभागी होणार

मुंबई - बालरंगभूमी परिषदने महाराष्ट्रातील बालकांना लोककलेचे माहिती देऊन प्रशिक्षित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या या लोककला महोत्सवामध्ये जवळपास २५ हजार बालके सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.

अखिल भारतील मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद ही बालनाट्यांची शिखर संस्था आहे. २ ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिन म्हणून घोषित केल्यानंतर बालरंगभूमी परिषदेने वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. याची माहिती देण्याकरीता यशवंत नाट्य संकुलात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत यांच्या समवेत लोककला महोत्सव समिती प्रमुख शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर, कोषाध्यक्ष दीपक रेगे, असिफ अन्सारी, अनंत जोशी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी निलम शिर्के म्हणाल्या की, बालरंगभूमी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे. लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव 'जल्लोष लोककलेचा' उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केल्याचे नीलम म्हणाल्या.

बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. ‌दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, लोककलेतील तज्ज्ञ मार्गदर्शक लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून करत असल्याचेही नीलम यांनी सांगितले.

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांच्या ठिकाणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या प्रत्यक्ष लोककला सादरीकरणाच्या महोत्सवात लोककलांवर आधारित समूहनृत्य, एकलनृत्य, समूहगीत, एकलगीत व लोकवाद्य असे सादरीकरण होतील. यातून बालकांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातील.

या शाखांमध्ये आयोजन...
बालरंगभूमी परिषदेच्या मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छ्त्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर, अकोला, नागपूर आदी जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सर्वच भागात लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. २५ ऑगस्टपर्यंत सर्व प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण होतील. ३० सप्टेंबरपर्यंत सादरीकरण पूर्ण होईल.

विशेष मुलांचाही सहभाग...
पहिला उपक्रम हा लोककला महोत्सवाचा असून, दुसरा विशेष मुले अर्थात दिव्यांग मुलांसाठीचा महोत्सव ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील बालकांसाठी कलासंस्कार घडवत नव्या पिढीला नव्या दिशा व नवे मंच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

Web Title: Balrangabhoomi Parishad to give folk art lessons to children; 25 thousand children will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.