नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा बाळू चहावाला, दिग्गज घेतात त्याचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:00 AM2022-03-27T09:00:32+5:302022-03-27T09:01:11+5:30

कोरोनाने अनेक बॅक स्टेज आर्टिस्टना देशोधडीला लावले. शिवाजी मंदिर नाट्यगृहात कलाकारांना चहा देणारा हा बाळू चहावालाही याला अपवाद नव्हता.

Balu Chahavala, an accurate predictor of the play in mumbai | नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा बाळू चहावाला, दिग्गज घेतात त्याचा कौल

नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा बाळू चहावाला, दिग्गज घेतात त्याचा कौल

Next

संजय घावरे

मुंबई : एखादे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरेल की नाही हे बाळू चार-पाच प्रयोग होईपर्यंत सांगतो. डॉ. श्रीराम लागू, मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर, सुधीर भट हेच नव्हे तर आता प्रशांत दामले, केदार शिंदे, भरत जाधव यांच्यासह बरेच जण बाळूचा कौल घेतात. बाळूचे नाटकांबाबतचे भाकीत आजपर्यंत कधीही खोटे ठरलेले नाही. कोणी विचारल्यास नाटकात कोणता बदल करावा हे देखील तो सांगताे. 

कोरोनाने अनेक बॅक स्टेज आर्टिस्टना देशोधडीला लावले. शिवाजी मंदिर नाट्यगृहात कलाकारांना चहा देणारा हा बाळू चहावालाही याला अपवाद नव्हता. १४ मार्च २०२० रोजी थिएटर्स बंद झाल्यावर बाळू वासकर कोल्हापुरातील कागलमधील आपले बोळावी गाव गाठले. त्यानंतर तो मुंबईत परतलाच नाही. शिवाजी मंदिरचे नूतनीकरण पूर्ण होत आल्याने आता बाळूला पुन्हा मुंबईत येण्याचे वेध लागले आहेत. बाळूपेक्षा त्याच्या अचूक अंदाजाची नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्यांना जास्त ओढ लागली आहे. बऱ्याच वर्षांपासून शिवाजी मंदिरमध्ये वास्तव्यास असलेल्या बाळूने अनेक नाटकांच्या तालमी पाहिल्या आहेत. बाळूची नाटकाची जाण ओळखून कलाकारांनी त्याचा सत्कारही केला होता.

मुंबईत आल्यापासून शिवाजी मंदिरमध्ये कलाकारांना चहा देण्याचे काम करणारा बाळू मागील दोन वर्षांपासून शेतात मिळेल त्या कामावर उदरनिर्वाह करीत आहे. बाळूच्या घरी पत्नी, मुलगा आणि आई आहे. दोन मुलींची लग्न झाली आहेत. बारावी झाल्यावर लॉकडाऊन झाल्याने मुलगाही बाळूसोबत गावीच आहे. कोरोनामध्ये काही कलाकारांसह कॅन्टिनचे मालक नाना काळोखे यांनी अर्धा पगार देत बाळूला मदतीचा हात दिला. कोणाकडे मागण्याचा स्वभाव नसल्याने कसोटीच्या काळात बाळूने चटणी-भाकरी खाऊन तग धरला. शिवाजी मंदिराची दारे पुन्हा उघडणार असल्याने बाळू मुंबईत परतणार आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर अंकुश चौधरीसह भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे अशा बऱ्याच कलाकारांनी बाळूला मुंबईत यायला सांगितले, पण इथे येऊन कोणावर भार बनायचं नसल्याने बाळू गावीच राहिला. 

नवीन नाटक सुरुवातीला तालमीप्रमाणेच असतं. पाच-सहा प्रयोगांनंतर अंदाज येतो. त्यानंतरचे प्रयोग पाहून मी माझं मत मांडतो. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्यापासून ते सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, मकरंद अनासपुरे अशा सर्वच मंडळींनी माझं कौतुक केलं आहे. आनंद भालेकर यांनी एक लाख रुपये देऊन सत्कार केला. हे सर्व चांगल्या वर्तणुकीचं फळ आहे. 
- बाळू वासकर 
(चहावाला, शिवाजी मंदिर)

Web Title: Balu Chahavala, an accurate predictor of the play in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.