Join us

बम्बार्डियर आता नव्या रूपात

By admin | Published: July 23, 2015 3:43 AM

पश्चिम रेल्वे मार्गावर दोन बम्बार्डियर लोकल धावत असतानाच आता आणखी एक नवी बम्बार्डियर लोकल मुंबईत दाखल झाली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांनी केलेल्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर दोन बम्बार्डियर लोकल धावत असतानाच आता आणखी एक नवी बम्बार्डियर लोकल मुंबईत दाखल झाली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार दोन नवे बदल करण्यात आले असून अनेक चाचण्यांनंतर ही लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ अंतर्गत बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईतील प्रवाशांसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकलची चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बांधणी केली जात आहे. यातील दोन लोकल १८ मार्च २0१५ रोजी पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या ताफ्यात दाखल झाल्या. सध्या सीमेन्स कंपनीच्या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असल्याने ताफ्यात दाखल झालेल्या नव्या बम्बार्डियर लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या का आणि या लोकलमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का, यासाठी एमआरव्हीसीकडून एक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व्हेतून प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या आणि त्यासाठी दहा प्रश्न तयार करण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देताना बम्बार्डियर लोकलच्या दरवाजाजवळ असलेला दुहेरी प्रकारचा खांब आणि दोन प्रवाशांना पकडता येईल असे वेगळ्या प्रकारचे एकच हॅण्डल बदलण्यात यावे, अशा सूचना प्रवाशांकडून सर्वेक्षणात करण्यात आल्या. या दोन्हींमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रियाही अनेक प्रवाशांनी दिली. त्यानुसार चेन्नईतील फॅक्टरीत बनत असलेल्या नव्या लोकलमध्ये हे दोन बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हे बदलही केले गेले. विरार कारशेडमध्ये २१ जुलै रोजी तिसरी नवी बम्बार्डियर लोकल दाखल झाली. या लोकलमध्ये हे बदल झाल्याचे दिसून आले. असेच बदल येणाऱ्या सर्व नव्या लोकलमध्ये दिसतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)