आंबिवलीत उभारला ३० मिनिटांत पूल, लष्कराचा प्रवाशांना दिलासा
By महेश चेमटे | Published: January 19, 2018 02:12 AM2018-01-19T02:12:19+5:302018-01-19T02:12:29+5:30
भारतीय लष्कराने आंबिवली स्थानकात अवघ्या तीस मिनिटांत पादचारी पूल यशस्वीपणे उभारला आहे. ‘बेली पद्धती’चा हा पूल केवळ अर्ध्या तासात स्थानकातील पोलवर ठेवण्यात आला.
महेश चेमटे
मुंबई : भारतीय लष्कराने आंबिवली स्थानकात अवघ्या तीस मिनिटांत पादचारी पूल यशस्वीपणे उभारला आहे. ‘बेली पद्धती’चा हा पूल केवळ अर्ध्या तासात स्थानकातील पोलवर ठेवण्यात आला. यासाठी ३५० टन वजनी क्रेन आणण्यात आली होती. या पुलासाठी १० मीटर ‘पाइल’ पद्धतीने पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे या पुलाला भक्कम आधार मिळाला आहे, अशी माहिती लष्कराचे ब्रिगेडीअर धीरज मोहन यांनी दिली. गुरुवारी सकाळी ११.१५ मिनिटांनी पूल उभारल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर करी रोड, एल्फिन्स्टन आणि आंबिवली स्थानकात लष्कराच्या मदतीने पादचारी पूल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत केली होती. यानुसार आंबिवली स्थानकातील पहिला लष्करी पादचारी पूल यशस्वीपणे उभारण्यात आला.
लष्कराच्या ‘बॉम्बे सॅपर्स’ या पुण्यात मुख्यालय असलेल्या इंजिनीअर्स तुकडीच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. सिव्हिल बांधकाम म्हणून हे काम पूर्ण करण्यात आले. चीन सीमारेषेवरून या पुलाचे सुटे भाग आणि अन्य साधनसामग्री आणण्यात आली होती. पूर्वतयारी म्हणून या सुट्या भागांची जोडणी करण्यात आली. या जोडणीला सहा तासांचा अवधी लागला. प्रत्यक्ष ५ तासांचा ब्लॉक मंजूर झाला. तत्पूर्वी पूल उभारण्यासाठी २ तास आणि १ तास राखीव अशा एकूण तीन तासांत नियोजित काम पूर्ण होईल, अशी पूर्वकल्पना मध्य रेल्वेला देण्यात आली होती, अशी माहिती ब्रिगेडीअर धीरज मोहन यांनी दिली. कल्याण ते कसारा मार्गादरम्यान ओव्हरहेड वायर, सिग्नल आणि अभियांत्रिकी प्रकारचे १४५ तासांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. या कामासाठी ३०० इंजिनीअर्ससह १५० ओव्हरहेड वायर पथक, ५० सिग्नल पथक होते.
पाच सत्रांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली. पहिल्या सत्रात माती परीक्षण, जागेची पाहणी आणि विविध कामांची मंजुरी घेण्यात आली. दुसºया सत्रात पुलाचा आराखडा निश्चित करण्यात आला. तिसºया सत्रात बांधकाम करण्यात आले. चौथ्या सत्रात सुट्या भागांची जोडणी आणि पूल उभारणी झाली. शेवटच्या टप्प्यात पायºया जोडून हा पूल रेल्वे प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.
‘हेरिटेज’ पूल
दुसºया विश्वयुद्धात या पुलाचा वापर करण्यात आला होता. परिणामी, आंबिवली स्थानकात हेरिटेज पुलाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे. सद्य:स्थितीत पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या पायºयांच्या कामासाठीदेखील सुरुवात करण्यात आली आहे. पुलावर फरशा बसवणे बाकी असून ते चोवीस तासांत पूर्ण होईल.
‘सॅपर्स’ म्हणजे काय?
भूदल, हवाईदल आणि नौदल यांना विजयी कामगिरी करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत पूल, धावपट्टी आणि जोडरस्ते बनविणाºया अभियांत्रिकी विभागाला ‘सॅपर्स’ असे म्हणतात. १८७० साली देशात मद्रास सॅपर्सच्या दोन कंपन्या अस्तित्त्वात आल्या. या धर्तीवर बॉम्बे आणि बेंगॉल सॅपर्सची उभारणी करण्यात आली. १८ नोव्हेंबर १९३२ रोजी हे तिन्ही सॅपर्स कोअर आॅफ इंजिनीअर्स म्हणून कार्यरत झाले. बॉम्बे सॅपर्सचे मुख्यालय पुणे, मद्रास सॅपर्सचे बंगळुरू आणि बेंगॉल सॅपर्सचे मुख्यालय रुरकी येथे आहे.
बेली म्हणजे...
यूएस सिव्हिल इंजिनीअर डोनाल्ड बेली याने या पुलाचा शोध लावला. सुट्टे भाग, सहज उभारणी, मजबूत आणि टिकाऊ ही बेली पुलाची वैशिष्ट्ये आहेत. आंबिवली स्थानकातील रेल्वे रुळापासून या पुलाची उंची ही ६.५ मीटर आहे.