बांबू लागवडीत ‘मिठाचा खडा’! आयुक्तालयाच्या मनाईमुळे पालिकेचा प्रकल्प अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:10 AM2024-03-27T10:10:15+5:302024-03-27T10:11:38+5:30
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा ८,१०० बांबूंच्या झाडांची लागवड करण्यास मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे.
मुंबई : मुंबई हिरवीगार व्हावी, प्रदूषण कमी करून जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती व्हावी, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात आठ हजार बांबूंच्या झाडांची लागवड करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने हाती घेतलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प अडचणीत आला आहे. या प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा ८,१०० बांबूंच्या झाडांची लागवड करण्यास मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे. त्यामुळे पालिकेला आता बांबू लागवडीसाठी अन्य जागांचा शोध घ्यावा लागणार आहे.
मुंबईत अलीकडच्या काळात प्रदूषण कमालीचे वाढले आहे. ते कमी करण्यासाठी मागील १४ आठवड्यांपासून स्वच्छ मुंबई मोहीम राबवण्यात येत आहे. त्याला जोड म्हणून बांबू लागवड करून प्रदूषण कमी करण्याच्या पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गालगत भांडुप ते विक्रोळी कन्नमवारनगर या पट्ट्यात बांबूची ८,१०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मुंबईत पाच लाख बांबूची झाडे विविध ठिकाणी लावली जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी २०२३-२४च्या सुधारित अर्थसंकल्पात ३५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर, २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजात त्यासाठी १७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या पूर्वी ‘मेट्रो कारडोपो’ अडचणीत-
यापूर्वी मीठ आयुक्तालयाच्या आक्षेपामुळे मेट्रो ३ चा कारडेपोही अडचणीत आला होता. या जागेची मालकी नेमकी कोणाची याची स्पष्टता नसल्याने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला या जागेवर कारडेपो बांधण्यात अडथळे आले होते. राज्यातील सत्तांतरानंतर कारडेपो कांजूरमार्ग ऐवजी आरे कॉलनीतच बांधण्याचे निर्णय झाल्याने मेट्रोची या पेचातून सुटका झाली होती.
मालकीवरून वाद -
१) भांडुप ते विक्रोळी पट्ट्यात बांबू लागवड करण्याची प्रक्रिया उद्यान खात्याने सुरू केली. मात्र, या ठिकाणी लागवड करण्यास मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे. या जागेत मिठागरे आहेत. त्यांची मालकी नेमकी कोणाची यावर सध्या वाद सुरू आहे. काही प्रकरणांत वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे बांबू लागवड करता येणार नाही, असे मीठ आयुक्तालयाने स्पष्ट केल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे.
२) परिणामी अन्य जागांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या उद्यानांमध्ये बांबूची लागवड करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. मात्र, उद्यानाचे सौंदर्य बाहेरून दिसण्यात अडचण येईल, असा आक्षेप घेण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.