Join us

राज्याचा वनविभाग राष्ट्रपती भवनात लावणार बांबू  

By अतुल कुलकर्णी | Published: August 12, 2018 5:14 AM

मुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी राज्यात बांबू शेतीसाठी केलेल्या कामावर चर्चा झाली. राष्ट्रपती भवनात बांबू लावता येतील का, अशी विचारणा राष्ट्रपतीनी केली. तेव्हा वनमंत्र्यांनी त्यास तात्काळ होकार दिला.आता राष्ट्रपती भवनाच्या ३४६ एकर जागेवर लाल, भगवा, जांभळा, हिरवा, पिवळा, काळा अशा विविध रंगांचे बांबू लावून देण्याचे काम वनविभाग करणार आहे. वनसचिव विकास खारगे यांना आराखडे करण्याचे आदेश देण्यात आले असून ते कामही पूर्ण होत आल्याने वनमंत्र्यांनी सांगितले.जगात बांबूच्या १,२५० प्रजाती आहेत. तर त्यापैकी १२३ प्रजाती भारतात आहेत. त्या सगळ्यांचा वापर राष्ट्रपती भवनात केला जाणार आहे. त्याशिवाय आजवर झालेल्या सगळ्या माजी राष्ट्रपतीची छायाचित्रे देखील बांबूच्या सहाय्याने बनवून तेथे लावली जाणार आहेत.हे काम करण्याआधी हैदराबाद येथील राष्ट्रपती भवनात देखील बांबूची रोपे लावण्याचा प्रस्ताव दिल्लीतून आला आणि राज्याच्यावन विभागाने तेथे मोठ्या प्रमाणावर रोपे व तज्ज्ञ अधिकाऱ्यांना पाठवून बांबू लावून देण्याचे कामही केल्याचे वनमंत्री म्हणाले.एक एकर जागेत जर अभ्यासपूर्ण रितीने बांबू लावण्यात आले व लावण्यात आलेल्या या बांबूची कापणी नीट केली तर वर्षाला एकते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून सहज मिळू शकते. त्यामुळे या विषयाचे अभ्यासक्रम राज्यातल्या विविध कृषी विद्यापीठांमधून सुरूकेले जात असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :राष्ट्राध्यक्षबातम्या