मुंबई : आवाज फाऊंडेशनने प्रयोगशाळेत फटाक्यांची चाचणी केली असून, यामध्ये पर्यावरण आणि मानवी आरोग्यास हानीकारक घटक आढळले आहेत. परिणामी अशा धोकादायक, घातक आणि विषारी रसायनांचा समावेश असलेलया फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, असा सूर लागवण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाऊले उचलावीत, असे म्हणणे आवाज फाऊंडेशनने मांडले आहे.
फटाक्यांमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. ज्यात सल्फर ट्रायऑक्साइड, व्हॅनिडियम पेंटॉक्साइड, पोटॅशियम ऑक्साईड्स आणि कॉपर ऑक्साईड्स आहे. हे सर्व विषारी आहे. ही हानिकारक रसायने हवेत सोडली जातात. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडते. या व्यतिरिक्त ध्वनी प्रदूषण देखील होत असून, यावर उपाय म्हणजे पर्यावरण पूरक दिवाळी साजरे करण्यात यावे, असे म्हणणे मांडले जात आहे. आता फटाक्यांमधील धोकादायक रसायनांच्या चाचणी परिणामामुळे मानवी आरोग्यास होणार्या गंभीर धोक्याबद्दल विचार करा. ज्यायोगे वायुप्रदूषण प्रश्न सोडता येऊ शकेल, असे आवाज फाऊंडेशनने म्हटले आहे. हवा आणि ध्वनी प्रदूषणात भर पडण्याची शक्यता असून, फटाके वापरणे अधिक धोकादायक आहे. परिणामी सरकारला विनंती आहे की तातडीने सर्व फटाक्यांच्या वापरावर बंदी घाला, अशी मागणी सरतेशेवटी केली आहे, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी दिली.
दुसरीकडे दिवाळीत फटाके फोडू नका. कारण फडाके फोडले आणि त्याचा धूर मोठया प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांनासह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठया प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या मिली शेटटी यांनी केले आहे. दरम्यान, दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.