मंडपात दर्शनावर बंदी! काय आहेत सरकारच्या सूचना ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:11 AM2021-09-09T07:11:12+5:302021-09-09T07:11:48+5:30
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना; आगमन-विसर्जन मिरवणुका नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता गणेशोत्सव अनावश्यक ‘जल्लोष टाळून, गर्दीला लगाम घालत मर्यादित स्वरूपातच साजरा करावा लागणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना गृह विभागाने बुधवारी जारी केल्या. सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन भाविकांना मंडपात जाऊन करता येणार नाही वा मुखदर्शनही घेता येणार नाही. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडपातील गणरायाचे लाईव्ह प्रक्षेपण करता येईल. त्यामुळे यंदा नामांकित, नवसाच्या गणरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे भाविकांना अशक्य होणार आहे. दर्शन केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे गृह विभागाने म्हटले आहे.
मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
श्रींची प्राणप्रतिष्ठा माध्यान्हकालीच योग्य
गणेशमूर्तीची स्थापना ही माध्यान्हकाली करावयाची आहे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी १२.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाल आहे. या वेळेत श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी. या वेळेत शक्य होणार नसेल तर पहाटे ५.३० पासून दुपारी १.४८ पर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना व पूजा करावी.
रविवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४९ नंतर अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवारी ज्येष्ठा गौरीपूजन करावे. मंगळवारी सकाळी ७.०४ नंतर मूळ नक्षत्रावर दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी विसर्जन करावे.
गर्दी टाळून आरोग्यविषयक शिबिरे, उपक्रम भरवा
nआरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित
करण्यास पसंती देण्यात यावी. लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही.
nसांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे राबवावित.
उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
nआरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
काय आहेत सरकारच्या सूचना ?
मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, घरी शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ
नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक
पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी
आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे.
लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
मूर्तीची उंची किती?
सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची उंची कमाल ४ फूट तर घरगुती गणपतीची उंची कमाल २ फूट असेल. शक्यतो पारंपरिक मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.