देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रवेश बंदी

By admin | Published: March 22, 2016 03:47 AM2016-03-22T03:47:12+5:302016-03-22T03:47:12+5:30

देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार लागणारी आग हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या डंपिंग ग्राऊंडला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली

Ban on entry to Deonar dumping ground | देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रवेश बंदी

देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रवेश बंदी

Next

मुंबई : देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार लागणारी आग हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या डंपिंग ग्राऊंडला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे़ त्यानुसार डंपिंग ग्राऊंडच्या परिसरात यापुढे प्रवेश बंदी असणार आहे़ तसेच रात्रीच्या वेळेत या परिसरावर कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येणार आहे़
वारंवार डंपिंग ग्राऊंडमध्ये लागणारी आग ही चिंतेचा विषय बनली असून यामागे घातपात असण्याची शक्यता खुद्द आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली़
देवनारमध्ये दररोज पाच हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो़ या कचऱ्यात मौल्यवान सामानही असल्याने ते जमा करुन विकणारी टोळीच येथे कार्यरत आहे़ कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून या वस्तू शोधण्यासाठी कचरामाफिया ही आग लावत असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कचरा टाकण्यात येत असलेल्या परिसरात यापुढे कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी जाहीर केले़
अंतर्गत रस्ते तयार करणार
डंपिंग ग्राऊंड परिसरात आग विझविण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन दलास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो़ प्रामुख्याने आतमधील रस्ते कचऱ्याने भरलेले असतात़ त्यामुळे पालिकेने अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहेत़ या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत़ तसेच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या कायमस्वरुपी तैनात ठेवण्यात येणार आहेत़
कचऱ्यापासून वीजनिर्मिती
दीर्घकालिन उपाययोजन म्हणून कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रस्तावासाठी टाटा कन्सलटंसी इंजिनिअर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ त्याचबरोबर यापुढे डंपिंग ग्र्राऊंडवर शास्त्रोक्त पद्धतीनेच कचरा टाकण्यात येणार आहे़
दरम्यान, डंपिंग ग्राऊंडवर १२३ फुटांचा कचऱ्याचा डोंगर तयार झाला असून त्याखाली असलेल्या मिथेन वायूमुळे आग लागण्याचा धोका कायम आहे़ त्यामुळे मिथेन वायूच नष्ट करण्यासाठी पालिकेने आयआयटीचा सल्ला घेण्यात येत आहे़चौकशीसाठी दिल्लीचे पथक
नवी दिल्ली : देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगी आणि त्यामुळे घातक वायूंचे होणारे उत्सर्जन ही अतिशय गंभीर बाब असून, त्याची चौकशी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी मुंबईला पोहोचत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण व वन खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी दिली. एका आठवड्यात ते अहवाल सादर करणार आहे. घन कचरा व्यवस्थापनाबाबत नवीन मार्गदर्शनपर सूचना संबंधितांना दिल्या जाणार असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.सोमवारी गुन्हा दाखल
देवनार येथील डंम्पिग ग्राऊंडवर रविवारी भडकलेल्या आगीप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक तपासात ही आग नैसर्गिक रित्या भडकल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. असे असले तरीही याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच या परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. आता सक्तीने अंमल : डंपिंग ग्राऊंड परिसर प्रतिबंधित असले तरी कचरावेचक बेकायदेशीरपणे प्रवेश करतात़ तसेच भंगार माफियाही या ठिकाणी सक्रिय आहेत़ या सर्वांनाही सक्तीने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे़ कचरा टाकण्यात येणाऱ्या परिसरात कोणालाही प्रवेश नसणार आहे़, असे प्रशासनाने स्पष्ट केले़डंपिंग ग्राऊंड परिसर हे प्रतिबंधित क्षेत्रच असते़ त्यात नव्याने डंपिंग ग्राऊंडला प्रतिबंधित जाहीर करुन प्रशासन काय साध्य करणार आहे़ देवनार डंपिंग ग्राऊंडवर वारंवार लागणारी आग हे पालिका प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला आहे़

Web Title: Ban on entry to Deonar dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.