वरळी कोळीवाड्यात प्रवेशबंदी; समूह संसर्गाच्या भीतीने धास्तावले होते प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:44 AM2020-03-31T01:44:33+5:302020-03-31T06:36:46+5:30
एकाच वेळी आठ संशयित सापडण्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती.
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील वरळी कोळीवाड्यात एकाच वेळी कोरोनाचे आठ संशयित आढळल्याने एकच खळबळ उडाली. ‘कम्युनिटी स्प्रेड’च्या शंकेने धास्तावलेल्या पोलीस आणि पालिका प्रशासनाने रातोरात वरळी कोळीवाडा परिसरात प्रवेशबंदी केली. कोळीवाड्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून सर्व दुकानेही बंद करण्यात आली. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत पालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरणासाठी या परिसरात फवारणी केली.
वरळी कोळीवाड्यातील संशयितांच्या आकड्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, एकाच भागातून नव्हे तर जनता कॉलनी, आदर्श नगर आणि कोळीवाडा अशा वेगवेगळ््या भागात संशयित सापडले. यानंतर प्रशासनाने तातडीने संपूर्ण परिसरात प्रवेशबंदी केली. नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
एकाच वेळी आठ संशयित सापडण्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, कम्युनिटी स्प्रेडींग नसल्याचे शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी सांगितले. एकाच घरातील चार जणांपैकी एकजण निगेटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. या भागातील अत्यावश्यक सेवा सुरू करण्याबाबत विचार विनिमय झाला आहे. मंगळवारी औषधांची दुकाने सुरू केली जातील.
दूधासह अन्य आवश्यक बाबींसाठी दोन हजार स्वयंसेवकांचा चमू तयार करण्यात आला आहे. एका स्वयंसेवकाकडे दहा - दहा जणांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर राखत आवश्यक वस्तूंची यादी घेऊन ठरलेल्या वेळेत विशिष्ट ठिकाणांवरून त्या वस्तू घेऊन संबंधित नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.
विक्रोळी येथे एक परिचारिकेला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. ही परिचारिका एका कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाची शुश्रूषा करणाºया टिममध्ये सहभागी होती.
बिंबिसारनगरातही कोरोना संशयित
गोरेगाव येथील बिंबिसार नगरातील एका इमारतीत एक कोरोना संशयित आढळल्याने या इमारतीतही प्रवेशबंदी करून करून हा परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कॉलनीत अनेक मराठी कलावंत राहातात.