Join us

बलात्काराचे बनावट गुन्हे रोखा

By admin | Published: January 30, 2017 2:22 AM

प्रेमप्रकरण आणि विवाहाचे वचन देऊन केलेल्या कथित बलात्कार फसवणूकींचे गुन्हे रद्दबातल करण्याचे आदेश राज्य पोलिसांना देण्यात यावे

मुंबई : प्रेमप्रकरण आणि विवाहाचे वचन देऊन केलेल्या कथित बलात्कार फसवणूकींचे गुन्हे रद्दबातल करण्याचे आदेश राज्य पोलिसांना देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका शल्यविशारद डॉ. अनुराग असीम याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आपल्याविरूद्ध दाखल असलेला गुन्हाही याच प्रकारातील असल्याचे त्याने म्हटले आहे.अ‍ॅड. महेश वासवानी, धारिणी नागदा आणि सुहेश शरीफ यांच्यामार्फत डॉ. असीम याने ही याचिका केली आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसळकर - जोशी यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी होणार आहे. तक्रारदार युवतीने ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार फेसबुकच्या माध्यमातून डॉ. अनुरास असीम याच्याशी ओळख झाल्यानंतर तिची त्याच्याशी मैत्री झाली. त्यानंतर ६ जून २0१६ रोजी मी त्याच्यासोबत अंधेरी, कळंबोली आणि नवी मुंबई येथे फिरावयास गेली. त्यानंतर त्याने आपल्याला त्याच्या घरी नेले. तेथे त्याचे डॉक्टर मित्र सौरव आणि डिम्पी होते. तेथे आरोपीने आपल्याला शितपेय दिले. त्यामुळे माझी शुद्ध हरपली. सकाळी मी उठले तेव्हा माझ्या अंगावर दुसरेच कुणाचे तरी कपडे होते. त्याबाबत असीमला विचारले असता त्याने आपण रात्री अर्धवट शुद्धीत असताना त्यांच्यात शरीरसंबंध आल्याचे सांगितले. त्याबद्दल त्याने आपली माफी मागून आपल्यासोबत विवाह करण्याचे वचन दिले. त्यानंतर त्यांच्या अनेकदा शरीरसंबंध आले. काही कालावधीनंतर डॉ. असीमने आपल्याशी संबंध तोडले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आपण त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान डॉ. असीम याला दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्या.डॉ.सी.ए. नाथानी यांनी अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. असीम याच्यावतीने अ‍ॅड. महेश वासवानी, धारीणी नागदा, सुहेल शरीफ आणि मानसी महांता, गौरव माने हे बाजू मांडत आहेत. ६ जून २0१६ रोजी तक्रारदार युवती आणि आरोपीची भेट झाली नव्हती तर ती जुलै महिन्यात झाली होती. आरोपीचे युवतीशी कोणतेही संबंध नव्हते तसेच त्याने तिला कोणतेही वचन दिले नव्हते. केवळ फेसव्हॅल्यूवरून पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. याबाबत सर्वच संबंधितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड मागवण्याची विनंती अ‍ॅड. महेश वासवानी यांनी न्यायालयाला केली आहे. तक्रारदार युवती आणि तिच्या साथीदारांनी आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)