मुंबईत 31 डिसेंबर अन् नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी, BMC चे आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 08:51 AM2021-12-25T08:51:25+5:302021-12-25T08:52:25+5:30
मुंबई महापालिकेने राजधानी मुंबईत 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त किंवा खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत.
मुंबई - नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असले तरी ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या १०८ वर गेल्याने आणि वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्रीपासून लगेच लागू झाले आहेत. त्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतवरही बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने राजधानी मुंबईत 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त किंवा खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे, यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही आजपासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार, रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंधाकडे महाराष्ट्राची वाटचाल दिसून येत आहे.
Maharashtra: BMC bans New Year celebration programmes in any closed or open space in Mumbai pic.twitter.com/hFMdpIXiU7
— ANI (@ANI) December 24, 2021
राजधानी मुंबईत दरवर्षी मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. गेट वे ऑफ इंडिया, जूह बीच, मोठ-मोठी हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. 31 डिसेंबर साजरा करुन चालू वर्षाला निरोप देणे आणि 1 जानेवारी 2022 चे स्वागत करण्याची अगोदरपासूनच तयारी सुरू असते. मात्र, यंदा कोरोनाचं सावट असल्याने या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबई नववर्षांच्या स्वागताचा कुठलाही कार्यक्रम होताना दिसणार नाही.
राज्य सरकारची नवीन नियमावली
समारंभासाठी बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल. आसनक्षमता निश्चित नसलेल्या ठिकाणी २५ टक्के लोकांना उपस्थित राहता येईल. कार्यक्रम खुल्या जागेत झाल्यास २५ टक्के उपस्थिती चालू शकेल.
खेळासाठी नियम
- क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी, हे निश्चित करेल
लग्न समारंभासाठी अटी
- लग्न समारंभासाठी सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी तितकी असेल.
- इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठीही उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितकी राहील.
५० टक्क्यांना परवानगी
- उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.
- याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक असेल.
संसर्गाचा धोका वाढला
ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
...तर अधिक बंधने
कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत. विशेषत: ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावत आहोत. पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार केला जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री