Join us  

कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठविली; १७ लाख मुंबईकर व पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय: CM

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 5:43 AM

अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली आहे. कामाचा खर्च, पर्यावरण समतोल, भविष्यातील १७ लाख मुंबईकर प्रवाशांची सोय यासाठी हा निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमींनी ही वस्तुस्थिती समजून घेतली तर त्यांचे समाधान होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर पर्यावरणाचा पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

आरेमधील मेट्रो कारशेड उभारणीच्या निर्णयाला ठाकरे सरकारने फिरवून बंदी घातली होती. या कारशेडवरून पर्यावरणवाद्यांनीही आंदोलने केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत एकदा या कारशेडच्या कामावरील बंदी उठविली आहे. मेट्रोतून १७ लाख मुंबईकर प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे रक्षणच होणार आहे. कामाला विलंब झाला तर कोट्यवधी रुपयांनी प्रकल्पाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे आपलेच नुकसान होणार आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळातच ही जागा निश्चित झाल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळात सौनिक समिती नेमली होती. या समितीने देखील कांजूरमार्गची जागा योग्य नसून आरेमधील जागाच योग्य असल्याचा अहवाल दिला होता. पर्यावरणवाद्यांनी यासंदर्भात आंदोलने केली. ते उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयातही गेले. मात्र, न्यायालयांनी त्यांच्या विरोधातच निकाल दिले आहेत. 

यानंतरही जर अशी आंदोलने होणार असतील तर ती करणाऱ्यांचा सद्हेतू आहे का असा प्रश्न निर्माण होतो. २ लाख मेट्रिक टनांचे कार्बन उत्सर्जन मेट्रोमुळे थांबणार आहे. प्रदूषणामुळे मुंबईकराचे रोज कमी कमी होणार आयुष्य या मेट्रोमुळे वाचणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.    

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमेट्रो