मुंबई : विविध शाळा, संस्थांमध्ये स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी मार्फत खासगी प्रशिक्षणे विद्यार्थी, शिक्षकांसाठी आयोजित केली जातात. मात्र, विद्या प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शाळेत आयोजित करू नये किंवा त्याला उपस्थिती दर्शविण्यास शासनाची मंजुरी आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मार्फत देण्यात आले आहेत.
अनेकदा त्रयस्थ संस्थांकडून आयोजित करणाऱ्या खासगी प्रशिक्षणामध्ये व्यावसायिक हेतू असल्याचे विद्या प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. तसेच काही संस्था एज्यु ॲप म्हणजेच तंत्रज्ञानाधारित शिक्षण संस्थांनी विकसित केलेले विविध इ साहित्य ही वापरण्याची सक्ती करीत असल्याचे मत विद्या प्राधिकरणाने नोंदवले आहे. यामुळे कोणत्याही प्रशिक्षणासाठी विद्या प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक राहणार असल्याचे संचालक एम. डी. सिंह यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
काय आहेत विद्या प्राधिकरणाच्या सूचना
- कोणत्याही अशासकीय सेवा संस्थांनी विकसित केलेले ई साहित्य शासन परवानगीशिवाय शाळांमध्ये वापरू नये. किंवा अशा कोणत्याही यंत्रणेची , अधिकाऱ्याची शिफारस शासन परवानगीशिवाय क्षेत्रीय यंत्रणेला करू नये.
- ई साहित्य वापरताना वापरकर्त्यांची गोपनीयता हा मूलभूत व सर्वोच्च अधिकार आहे.
- खासगी संस्थेमार्फत प्रकल्प / सर्वेक्षण , उपक्रम अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित जिल्ह्यातील विद्या प्राधिकरणाला निदर्शनास आणून द्यावे.