Join us  

कामा रुग्णालयाकडून रील्स बघण्यावर बंदी; अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 'आचारसंहिता'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 8:53 AM

मोबाइलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रील्स बघण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. शासकीय कार्यालयांत काही कर्मचारीही हे रील्स पाहण्यात व्यस्त असतात. त्याला आळा घालण्यासाठी कामा रुग्णालय प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी ऑनड्युटी असताना मोबाइलचा गैरवापर टाळावा. तसेच रील्स बनवू नये आणि बघू नयेत, असा फतवा काढला आहे.

रुग्णालयात मोबाइलचा वापर हा शासकीय कामासाठीच करावा. तसेच शासकीय कामकाजासाठी संदेश पाठविण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करावा. जेणेकरून ऑडिओ-व्हिडीओ क्लिप, फाइल्स आदी माहितीची सुरक्षित देवाण-घेवाण होईल. तसेच जे कर्मचारी कामावर असताना मोबाइलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

नातेवाइकांना थांबण्याची जागा कामा रुग्णालयात नातेवाइकांना थांबण्यासाठी एक विशिष्ट जागा करून देण्यात आली आहे. तेथेच त्यांनी थांबणे अपेक्षित आहे. दिवसभर नातेवाईक रुग्णालयात फिरत असतात. त्यावर आता प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच सुरक्षारक्षकांनी दर तीन तासांनी रुग्णालय परिसरात फेरी मारणे अपेक्षित आहे. तसेच फूड डिलिव्हरी बॉईजनी रुग्णालयात किंवा हॉस्टेलमध्ये न जाता रुग्णालयाच्या परिसरात ठरविलेल्या जागीच फूड पार्सल ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :हॉस्पिटल