मुंबई: अभियांत्रिकीच्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना २०१५ या वर्षीचा पेपर पुन्हा २०१६ च्या परीक्षेला देण्यात आल्याची घटना १५ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पेपर सेटरच्या कॉपी-पेस्ट सवयीमुळे गेल्या वर्षीचाच पेपर विद्यार्थ्यांच्या हाती परीक्षेवेळी आला होता. या प्रकरणाची चौकशी करून, त्या प्राध्यापकावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. १६ डिसेंबरला इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांचा इन्स्ट्रूमेंट अँड मेजरमेंटचा पेपर होता. विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आलेला हा पेपर हुबेहूब २०१५च्या पेपरप्रमाणेच असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. कॉपी-पेस्ट करताना पेपर सेटरची चूक झाली होती. या संदर्भात १९ डिसेंबरला तत्काळ परीक्षा भवनात बैठक बोलावण्यात आली होती. त्या वेळी हे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर, पेपर सेटरला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती बसवण्यात आली होती. पेपर सेटर हा उपनगरातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आहे. या प्राध्यापकाने बैठकीत आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल केले. त्यानंतर, त्या प्राध्यापकावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
प्राध्यापकावर तीन वर्षांसाठी बंदी
By admin | Published: January 02, 2017 6:55 AM