डोंबिवली : ऐश्वर्याचे प्रदर्शन करणाऱ्या सोहळ््यांवर बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात करण्यात आला. खुल्या अधिवेशातील हा ठराव बिगरसाहित्यिक असून तेथे अशा प्रकारचे ठराव करण्यावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी मनसे जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई यांनी केली. साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशात ३० ठराव करण्यात आले. त्यापैकी मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, आकाशवाणी केंद्रावर मराठी अधिकाऱ्यांची भरती करावी, महाराष्ट्रबाहेरील मराठी शाळांना अनुदान द्यावे; साहित्य, लेखक, पत्रकारांच्या संरक्षणाची मागणी रास्त आहे. मराठी भाषा व साहित्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले ठराव साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केले जावेत, याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. मात्र राज्याच्या विविध भागातील समारंभ, सोहळे, कार्यक्रम यातून होणारे ऐश्वर्याचे प्रदर्शन रोखून संपत्तीची उधळण करणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा ठराव पूर्णपणे बिगरसाहित्यिक असल्याने त्याला मनसेने विरोध केला आहे. पिपरीतील साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. इतकेच नव्हे तर साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेला निधीही आयोजकांनी सरकारला परत केला. तेव्हा पैशाची उधळण होते होती, याचे भान साहित्य महामंडळाला नव्हते का, असा सवाल त्यांनी केला. आगरी यूथ फोरमने साहित्य संमेलनासाठी एक कोटी ५८ लाखांचा निधी जमा झाल्याचे घोषित केले होते. मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात, ग्रंथालये वाढीस लागावीत, त्यांना पुस्तके पुरवली जावी, ग्रंथपालांचे वेतन वाढवावे यासाठी आयोजकांनी त्यातील काही निधी देऊ केला नाही. हा सगळा पैसा संमेलनाच्या भव्य दिव्य आयोजनावर खर्च केला. यातून संपत्तीचे प्रदर्शन आणि उधळण झाली नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. राजकीय नेत्यांकडून निधी घ्यायचा, त्यांच्याविरोधात ठराव मांडून संस्कृतीचे जतन करीत असल्याचा आव आणायचा हा कुठला न्याय, असा प्रश्नही प्रभूदेसाई यांनी महामंडळाला विचारला आहे. (प्रतिनिधी)
बिगर-साहित्यिक ठराव मंजूर करण्यावर बंदी घाला!
By admin | Published: February 08, 2017 3:56 AM