खाऊच्या स्टॉल्सला गणेशोत्सवात मनाई, पालिकेकडून कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 03:56 AM2018-09-04T03:56:30+5:302018-09-04T03:57:53+5:30
पावसाने ब्रेक घेतल्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मंडपाच्या आसपास खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास महापालिकेने मनाई केली आहे.
मुंबई : पावसाने ब्रेक घेतल्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मंडपाच्या आसपास खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास महापालिकेने मनाई केली आहे. या आदेशानंतरही गणेश मंडपाबाहेर स्टॉल्स दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
पावसाळ्यात मुंबईत मलेरिया, डेंग्यू असे साथीचे आजार पसरतात. गेल्या तीन महिन्यांत मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच, सप्टेंबर महिन्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सवात खाद्यापदार्थांच्या स्टॉल्सवरच बंदी आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
गणेशोत्सवात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने, मंडपाच्या बाहेर अनेक खाद्यपदार्थांची दुकाने लावली जातात. मात्र, उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका संभावतो.
त्यामुळे मंडपाशेजारील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल्स लावण्यास पूर्णपणे मनाई केली जाणार आहे. या आदेशाला न जुमानणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाºयांना दिले आहेत.
जनजागृती करण्याचे आदेश
साथीच्या आजारांबद्दल जनजागृती करण्याचे आदेश आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
तसेच गणेशोत्सवाच्या ठिकाणी प्रबोधनात्मक पोस्टर लावणे, ध्वनिफिती व चित्रफितींचे वाटप करून, त्याचा गणेशोत्सव कालावधीत नियमित उपयोग करण्याची विनंती गणेश मंडळांना करण्यात येणार आहे.
उघड्यावरील खाद्यपदार्थ, निकृष्ट दर्जाचा बर्फ यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच विभाग स्तरावर जादा मनुष्यबळ लावून स्वच्छता ठेवण्यात येणार आहे.