प्लॅस्टिकमधून अन्न नेण्यास बंदी

By admin | Published: January 7, 2016 02:25 AM2016-01-07T02:25:25+5:302016-01-07T02:25:25+5:30

मुंबईतून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याची मोहीम पुन्हा एकदा जोर धरत आहे़ प्लॅस्टिकवर सरसकट बंदी आणण्याचा प्रयत्न सात वर्षांपूर्वी अपयशी झाल्यानंतर, आता उपहारगृह, खानावळीतील अन्नपदार्थ

Ban taking food from plastic | प्लॅस्टिकमधून अन्न नेण्यास बंदी

प्लॅस्टिकमधून अन्न नेण्यास बंदी

Next

शेफाली परब-पंडित, मुंबई
मुंबईतून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याची मोहीम पुन्हा एकदा जोर धरत आहे़ प्लॅस्टिकवर सरसकट बंदी आणण्याचा प्रयत्न सात वर्षांपूर्वी अपयशी झाल्यानंतर, आता उपहारगृह, खानावळीतील अन्नपदार्थ प्लॅस्टिकमधून देण्यास बंदी आणण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आला आहे़ मात्र, अशा बंदीचा हॉटेल व रेस्टॉरंट मालकांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे़
२००५ मध्ये मुंबईला तडाखा देणाऱ्या पुरासाठी प्लॅस्टिक जबाबदार असल्याचे उजेडात आले होते़ प्लॅस्टिकने नाल्यांचे तोंड बंद केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता़ ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर प्लॅस्टिकवर सरसकट बंदी आणण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत मंजूर झाला. एवढेच नव्हे, तर प्लॅस्टिकवर सरसकट बंदी आणण्यास यशस्वी झालेल्या शहरांचा अभ्यासही पालिका अधिकाऱ्यांनी केला होता़ या बाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शविली होती़
मात्र, या बंदीचा प्लॅस्टिक उत्पादकांकडून विरोध होऊ लागला़ त्यामुळे सरसकट प्लॅस्टिक बंदी हे पालिकेसाठी एक स्वप्नच ठरले होते़ सात वर्षांनंतर ही मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. या वेळी अन्नपदार्थ बांधून देण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी आणण्याची ठरावाची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रुपाली रावराणे यांनी मांडली
आहे़ मात्र, असे ठराव करताना आधी पर्याय सुचवा, अशी नाराजी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरेंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी व्यक्त केली आहे़
बंदीला विरोध का?
प्लॅस्टिकचा वापर मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ सुमारे एक लाख रोजगार प्लॅस्टिक उत्पादनाच्या व्यवसायात आहेत़ प्लॅस्टिक बंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल़, तसेच अन्नपदार्थ बांधून देण्यासाठी प्लॅस्टिकला दुसरा पर्याय काय, कागदी पिशव्यांतून देणे शक्य नाही़ ग्राहकांना घरातून भांडी आणण्यास सांगायचे का, हा ठरावच व्यवहार्य नाही, असे मत हॉटेल अँड रेस्टॉरंटचे मालक व्यक्त करीत आहेत़
असा झालेला बंदीचा प्रयत्न
२००९ मध्ये तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांनी प्लॅस्टिक बंदीचे आदेश दिले होते़ त्यानुसार, प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास अशा कारवाईचाही निर्णय झाला़ आजच्या घडीला ५० मायक्रॉनपेक्षा कमी जडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे़ १९९८ मध्येही अशी बंदी आणण्याचा प्रयत्न झाला होता़
२६ जुलै २००५ मध्ये
मुंबईत पूर आला, ज्यात शेकडो लोकांचे जीव गेले़ हजारोंचे संसार रस्त्यावर आले़ नाल्यांमध्ये प्लॅस्टिक तुंबून राहिल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ शकले नाही, त्यामुळेच ही परिस्थिती ओढावली, असे उजेडात आले़ त्यानंतरच प्लॅस्टिक बंदीची मागणी जोर धरू लागली़ हॉटेलमध्ये गरम अन्नपदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांमधून देण्यात येतात़ त्या मधील अदृश्य रासायनिक द्रव्य पदार्थांमध्ये विरघळतात आणि अन्न दूषित होऊन विकार जडतात़

Web Title: Ban taking food from plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.