मुंबई : गल्लीच्या नाक्यावरची टपरी असो किंवा छोटे हॉटेल, वडापाव, भजी असे पदार्थ सर्रास पेपरमध्ये गुंडाळून देण्यात येतात. ब-याच वेळा जुनी वृत्तपत्रे यासाठी वापरली जातात. मात्र वृत्तपत्राच्या शाईतील विषारी घटक शरीरात जाऊन गंभीर आजार होण्याचा धोका यामुळे वाढत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून देण्यावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना लवकरच पालिकेच्या महासभेपुढे चर्चेसाठी येणार आहे.मुंबईच्या नाक्यावर उभ्या असणाºया खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मिळणारे गरमागरम पदार्थ म्हणजे सर्वसामान्यांच्या पोटाला आधार. मात्र हे विक्रेते ग्राहकांना हे गरम-तळलेले पदार्थ पेपरमध्येच गुंडाळून देत असतात. मात्र वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाºया शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या कागदात गुंडाळलेल्या वडापाव, भजीसह इतर खाद्यपदार्थांत शोषून घेतला जातो. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका संभवतो. हा विषारी घटक म्हणजे कर्करोगालाच आमंत्रण आहे. त्यामुळे मुंबईत खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून विक्री करण्यास तत्काळ बंदी घातली जावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे. त्यांची ही ठरावाची सूचना लवकरच पालिका महासभेपुढे मंजुरीसाठी येणार आहे. महासभेने मंजुरी दिल्यास ही ठरावाची सूचना आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार आहे.महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार घातक रोगांच्या प्रसारास प्रतिबंध व आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हे मुंबई महापालिकेचे आवश्यक आणि बंधनकारक कर्तव्य आहे, याचे चेंबूरकर यांनी ठरावाच्या सूचनेतून महापालिकेला स्मरण करून दिले आहे.धोक्याचा इशारा : खाद्यपदार्थ वृत्तपत्रांच्या कागदांमध्ये गुंडाळणे आरोग्यास धोकादायक ठरते. अशा खाद्यपदार्थांच्या सेवनाने आरोग्य बिघडण्याचा धोका संभवतो, अशी धोक्याची सूचना फूड, सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय) यांनी गेल्या वर्षी जाहीर केली होती.पुनर्प्रक्रिया केलेले पेपर, कार्डबोर्ड बॉक्समध्येही आरोग्यास घातक रसायनांचा वापर केलेला असतो. पचनाचा त्रास संभवतो तसेच विषबाधाही होण्याचा धोका असतो. वृद्ध, किशोरवयीन, लहान मुले तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना कर्करोगाचा धोका अधिक असतो.
वडापाव, भजी पेपरमध्ये गुंडाळून देण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 3:00 AM