तलावाजवळ केळी विकणारा ज्ञानू बनला PSI, मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 06:04 PM2019-03-21T18:04:00+5:302019-03-21T18:04:33+5:30
२०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रामध्ये १४१० उमेद्वारपैकी खुला वर्गमधून १६१ वा क्रमांक पटकावला
मुंबई - दक्षिण मुंबई येथील धोबी तलाव येथे केळी विक्रीचा व्यवसाय करत पदवीधर शिक्षण घेतले. बालवयात खेळण्याचे वय असताना कुटुंबाची जबाबदारी पडली. गेली सात वर्षे जिद्द, चिकाटी, प्रामाणिक मेहनत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रामध्ये १४१० उमेद्वारपैकी खुला वर्गमधून १६१ वा क्रमांक पटकावला तर मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात दुसरा आहे. अशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेत संघर्ष करत ज्ञानेश बाबू येडगे यांना घवघवीत यश मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात येडगेवाडी येथे धोंडिबा जानू येडगे आणि बबीबाई धोंडिबा येडगे या दाम्पत्याचा ज्ञानेश हा मुलगा. ज्ञानेश ८ - ९ महिन्याच्या असताना तो मोठ्या चुलत्यांकडे स्वतःहून गेला. लोकांनी या गोष्टीला दत्तक असे नाव दिले. मात्र, तसे झाले नाही. धोंडिबा जानू येडगे यांच्या घरी जन्म झालेला ज्ञानेश आता बाबू जानू येडगे यांच्या घरी राहत होता. एका मागून एक दिवस निघत होते. नंतर प्राथमिक शिक्षण येडगेवाडी शाळेत झाल्यावर ज्ञानेशला शिकण्यासाठी मुंबईला आणण्यात आले. प्रथम म्युनिसिपल शाळेत आणि नंतर चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण ज्ञानेशने घेतले. बाबू जानू येडगे यांचा धोबी तलाव मुंबई येथे केळी विक्रीचा व्यवसाय आहे. ज्ञानेश तिथे लहानपणापासून जात असे. मात्र सगळे व्यवस्थित चाललेले असताना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होते असं म्हणावं लागेल. त्यांचे वडील बाबू जानू येडगे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला होता. कुटुंबाची जबाबदारी वयाच्या १४ व्यावर्षीच ज्ञानेशवर येऊन पडली. त्यानंतर केळी विक्रीचा व्यवसाय सांभाळून ज्ञानेशने १० वीची परीक्षा दिलीआणि त्यात त्याला चांगले गुण मिळाले. असे करत १२ वी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने केळीचा व्यवसाय सांभाळतच पूर्ण केले. त्यानंतर त्याने एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी पत्करली आणि एका बाजूने एमपीएससीचा अभ्यास सुरु केला. पहिल्या 3 प्रयत्नांत मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्यानंतरही यश हुलकावणी देत होते. अखेर त्याने मनाशी जिद्द बाळगून एअर इंडियाला राजीनामा देऊन पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. नंतर जोरदार अभ्यास पुन्हा एकदा चालू केला आणि अखेर ती वेळ आली ज्यावेळी ज्ञानेशने उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झालं.
वडील असताना त्यांची इच्छा होती की ज्ञानेशने डॉक्टर व्हावे, पण वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे ते शक्य होणार नाही हे ओळखून त्याने सिडनहॅम महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागात प्रवेश घेतला आणि पदवी पूर्ण केली. मात्र, वडिलांचे स्वप्न त्याला सारखे खुणावत होते. त्यामुळे डॉक्टर बनणे आता शक्य नाही पण एक अधिकारी मात्र आपण नक्की बनू शकतो याची त्याला जाणीव झाली होती. दरम्यानच्या काळात शैक्षणिक वर्षांमध्ये त्याला ज्ञानेशचा मोठे बंधू सुरेश येडगे आणि त्यांची पत्नी सुप्रिया येडगे यांनी त्याला मुलासारखी साथ दिली आणि या सर्व प्रक्रियेत त्याला त्याचे सर्व भाऊ, चुलते, बहिणी यांची मानसिक साथ दिली होती.