Join us  

बनावट मुद्रांक विकणारी टोळी जेरबंद

By admin | Published: March 05, 2016 3:34 AM

अंधेरी, वांद्रे आणि किल्ला कोर्ट परिसरात बनावट मुद्रांक विक्री करणाऱ्या ९ जणांच्या टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने आवळल्या. यामध्ये ३ वकिलांचा समावेश आहे

मुंबई : अंधेरी, वांद्रे आणि किल्ला कोर्ट परिसरात बनावट मुद्रांक विक्री करणाऱ्या ९ जणांच्या टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने आवळल्या. यामध्ये ३ वकिलांचा समावेश आहे. अटक आरोपींकडून तब्बल १५ हजार ५०० मुद्रांक हस्तगत केले आहेत.निर्मलनगर येथील एका तरुणाला कामासाठी बनावट मुद्रांक मिळाल्याचे लक्षात आले. त्याने या प्रकरणी तत्काळ निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी मालमत्ता कक्षाने समांतर तपास सुरू केला. मालमत्ता कक्षाचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक गेल्या पाच महिन्यांपासून अंधेरी, वांद्रे आणि किल्ला कोर्टाबाहेर या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर गुरुवारी या टोळीचा पर्दाफाश करण्यास मालमत्ता कक्षाला यश आले. बनावट मुद्रांक विक्रीप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली. हरिदास रामअवतार प्रजापती , विवेक पांडे , रवींद्रकुमार तिवारी या तीन वकिलांसह राजबहादूर यादव , सरनाप्पा मांगलगी उर्फ नीलेश, मोहमद शेख, विमलेंदू द्विवेदी, नागेंद्र तिवारी, सुधीरकुमार बरनवाल यांचा यात समावेश आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीकडून १९५७ सालातील मुद्रांक हस्तगत करण्यात आले. मागील तारखांचे शिक्के मारून ही मंडळी नागरिकांकडून ३-४ हजार रुपये उकळत होती. मुद्रांकांच्या सिरीयल क्रमांकांमध्ये फेरफार करून ते विकणे त्यांचा व्यवसाय बनला होता. त्यांच्याकडून ७ लाख १ हजार किमतीचे तब्बल १५ हजार ५०० मुद्रांक हस्तगत करण्यात आले आहेत. त्यापैकी ३०० मुद्रांक हे बनावट आहेत. (प्रतिनिधी)