पेपर लिहून हाताला जखमा होऊ नये याकरिता बांधले बँडेज; कश्मिरा संखे यांनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:41 AM2023-05-25T07:41:49+5:302023-05-25T09:21:53+5:30

युपीएससीतील राज्यातील टाॅपरचा ‘लोकमत’च्यावतीने सत्कार

Bandages tied to prevent injury to the hand from writing papers; An experience shared by Kashmira Sankhe UPSC topper of maharashtra | पेपर लिहून हाताला जखमा होऊ नये याकरिता बांधले बँडेज; कश्मिरा संखे यांनी सांगितला अनुभव

पेपर लिहून हाताला जखमा होऊ नये याकरिता बांधले बँडेज; कश्मिरा संखे यांनी सांगितला अनुभव

googlenewsNext

लोकमत न्यू नेटवर्क
ठाणे : भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा (यूपीएससी)  सलग पाच दिवस नऊ पेपर द्यायचे असल्याने लिहिताना बोटं, हात यावर पेन घासून जखमा होण्याची भीती होती. हा धोका ओळखून हाताला इजा पोहोचू शकेल, अशा ठिकाणी बॅन्डेज बांधले होते. परीक्षा संपली तेव्हा माझा उजवा हात सतत लिहून सुजला होता. यूपीएससी परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांनी ही आपबिती कथन केली. लोकांना यश दिसते, पण यशाचे परमोच्च शिखर गाठण्यापूर्वीची मेहनत फारच थोड्यांना दिसते, अशी भावना तिने व्यक्त केली.

डॉ. कश्मिरा हिच्या यशाचा आनंद बुधवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयात साजरा करण्यात आला. तिने कसे यश संपादन केले, याविषयी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी व लोकमतच्या एचआर विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे यांच्या उपस्थितीत डॉ. कश्मिरा हिचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

डॉ. कश्मिरा म्हणाली की, राज्यात प्रथम येईन, असे वाटले नव्हते. मात्र आशा होती. तोंडी परीक्षेत काय प्रश्न विचारले, असे विचारले असता, कश्मिरा म्हणाली की, मुलाखतीला मी चंदेरी साडी परिधान केली होती. त्यामुळे साडीविषयी प्रश्न विचारला गेला. साडी परिधान करण्याबाबत नवी पिढी काय विचार करते, असे विचारले होते. त्यावेळी आजही साडीला महिला प्राधान्य देतात. तसेच ओडिशामध्ये एका मॅरेथॉन स्पर्धेत संबलवारी साडी परिधान करून एका महिलेने मॅरेथॉन जिंकली होती, असे उत्तर दिले. 

यावेळी तिचे वडील किशोर, आई प्रतिमा, भाऊ अथर्व, बहीण रिया, जीवन विद्या मिशनचे पदाधिकारी बन्सीधर राणे, विष्णू सरोदे, श्रीकांत राणे,  लाेकमतचे वितरण विभागप्रमुख शरद सुरवसे आदी उपस्थित होते.

कामातून असेच नाव मिळव - राजेंद्र दर्डा
तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. तुझ्या मेहनतीमुळे तू राज्यात पहिली आलीस. आता तुझ्या कामातून तू महाराष्ट्रात अव्वल दर्जाची आयएएस अधिकारी हो..!, अशा शुभेच्छा लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी कश्मिराला दिल्या. महाराष्ट्राला अनेक उत्तम व नामवंत महिला आयएएस अधिकाऱ्यांची परंपरा आहे. त्या परंपरेत जाण्यासाठी तू मेहनत कर, असेही राजेंद्र दर्डा यांनी फोनवरून शुभेच्छा देताना सांगितले. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी देखील कश्मिराला शुभेच्छा दिल्या.

तीन वर्षे व्हॉट्सॲप वापरले नाही
डॉ. कश्मिरा म्हणाली की, यूपीएससी परीक्षा यापूर्वी दोनवेळा दिली. परंतु यश मिळाले नाही. तिसऱ्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचे हे ठरवून अभ्यास केला. तीन वर्षे व्हॉट्सॲप वापरले नाही. शालेय अभ्यासात ‘बनगरवाडी’ आणि ‘हद्दपार’ या कादंबऱ्या होत्या. त्याचा अभ्यास कादंबरीतील पात्रांचा अभिनय करून केला.

Web Title: Bandages tied to prevent injury to the hand from writing papers; An experience shared by Kashmira Sankhe UPSC topper of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.